नवी मुंबई : शिरवणे येथील भारती बारमध्ये काम करणाऱ्या कामगाराची अन्य तीन कामगारांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विक्रम कुमार यादव, पप्पू चौधरी आणि शिवा केवट अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर उदय शेट्टी असे यातील मयत व्यक्तीचे नाव आहे. उदय हा गेल्या वीस वर्षांपासून शिरवणे येथील भारती बारमध्ये काम करत आहे. त्याला झोपण्यास एक वेगळी खोली असून त्या ठिकाणी अधून मधून इतर कामगारही झोपतात.
याच खोलीत तो पगार व ग्राहकांनी दिलेली टीप जमा करून एके ठिकाणी गुपचूप ठेवत असे. हि बाब विक्रम उर्फ पप्पू याला कळली. त्याने हि रक्कम चोरी करण्यासाठी झारखंड येथील दोन साथीदारांना सोबत घेतले. हे दोघेही सदर बारमध्ये विक्रम यांच्या शिफारशीवरून कामावर रुजू झाले होते. संधी शोधून तिघे उदय शेट्टी ज्या खोलीत झोपतो तिथे गेले. पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या ठिकाणी पैसे ठेवले त्या कपाटाला कुलूप होते. हे कुलूप तोडत असताना होणाऱ्या आवाजाने उदय जागा झाला. काय होत आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने प्रतिकार केला. मात्र त्याच वेळी त्याला तिघांनी मारहाण सुरु केली. त्यात एकाने त्याच्या डोक्यावर मागून स्टम्पचा जोरदार फटका दिला. तिथेच उदय शेट्टी पडला. आरोपींनी तेथून पलायन केले.
हेही वाचा : नवी मुंबई : मंदिराची दानपेटी आणि पादुका चोरीला
काही वेळाने येथे आलेल्या कृष्णा नावाच्या अन्य कामगाराने उदय शेट्टी निपचित पडल्याचे पाहिल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. नेरुळ पोलिसांनी सदर ठिकाणी येत चौकशी केली असता विक्रमकुमार यादव आणि मयत उदय शेट्टी यांचे वाद असल्याचे समोर आले. हे समोर येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी तात्काळ विक्रमकुमार आणि घटना झाल्यापासून आढळून न येणारे शिवा आणि पप्पू याचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. त्यांना अटक केल्यावर केलेल्या चौकशीत सर्व घटनाक्रम समोर आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.