नवी मुंबई : आजच्या सायबर युगात आपण इलेक्ट्रॉनिक साहित्य वापरत असताना अपडेट राहणे खूप आवश्यक आहे. नवी मुंबईतून तासाभराच्या अंतराने कारच्या काचा फोडून दोन लॅपटॉप चोरी झाले होते. त्यातील एका लॅपटॉपमध्ये लॅपटॉप कुठे आहे हे लॅपटाॅपचे लोकेशन बदलताच मोबाईलवर संदेश देणारी यंत्रणा असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला आणि अवघ्या चोवीस तासांत चोरटे जेरबंद झाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेनिथील दुरायरजन कुमार, मुर्ती रामासामी चिन्नाप्पन, शिवा विश्वनाथन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १० तारखेला संध्याकाळी अमेय विचारे आणि अभिषेक वैखान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी, सेक्टर १७, वाशी येथे पार्क केली होती. काही वेळाने अमेय हे आपले काम आटोपत ते जेव्हा कार मध्ये बसले त्यावेळी गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. नेमके याच वेळेस या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर अभिषेक यांनाही हाच अनुभव आला होता. अभिषेक यांचा अन्य लॅपटॉप त्यांनी दुरुस्तीसाठी दिला होता. तो घेऊन आल्यावर गाडीतील लॅपटॉप कारची काच फोडून नेल्याचे समोर आले होते. दोघांनीही याबाबत वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला होता. 

हेही वाचा : नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालय नव्या इमारतीत सुरू

यात अमेय यांच्या लॅपटॉप मध्ये एक अशी स्वयंप्रणाली होती की लॅपटॉप कुठे असेल ते मोबाईल वरून शोधता येते वा लॅपटॉपचे लोकेशन बदलले तरी मोबाईलवर संदेश येत होता. याचा फायदा तपास करताना पोलिसांना झाला तसेच गुन्हा घडल्यावर घटनास्थळा वरील सी. सी. टी. व्ही फुटेज तपासण्यात आले. व आरोपीतांचे ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाणेमधील अभिलेख तपासण्यात आला होता. आरोपी हे घटनास्थळी पायी चालताना दिसुन येत होते. तसेच चोरीस गेलेल्या फिर्यादी यांच्या लॅपटॉपचे लोकेशन बाबत फिर्यादी यांना वारंवार त्यांच्या आय फोनवर माहिती मिळत होतीच.

अशातच १२ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे लोकेशन मिळताच याबाबत माहिती स्थानिक पोलिसांना दिली. तसेच वाशी पोलिसांचे पथक ही रवाना झाले. सुदैवाने पथक जाईपर्यंत छ. शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या आतील भागातील लोकेशन दाखवले गेले. रेल्वे पोलीसांच्या मदतीने तीन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तीन लॅपटॉप आढळून आले . त्यात अमेय आणि अभिषेक यांचाही लॅपटॉप होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.

हेही वाचा : खारघरमध्ये दिसणारा ‘तो’ प्राणी कोणता? वन विभाग कर्मचाऱ्यांचे पथक तैनात

आरोपी हे तमिळनाडु राज्यातून तिर्ची येथून आले होते. गेल्या २० दिवसांत पूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले आहेत. या दरम्यान त्यांनी वाशी, नवघर, मुंलुंड, सी.बी.डी, नाशिक, पुणे, पंढरपुर अशा परिसरातून कारची काच फोडुन चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून एकुण ०७ गुन्हे उघडकिस आणण्यात यश आले आहे. याशिवाय यापूर्वी आरोपींनी संपुर्ण भारतभर अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस निरीक्षक संजय नाळे. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, पवन नदि, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे, पोलीस हवालदार सुनिल चिकणे, पोलीस नाईक दिलीप ठाकुर, पोलीस शिपाई अमित खाडे, केशव डगळे यांनी केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai 3 laptop thieves arrested by police due to laptop location trace system css
Show comments