नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ येथे आठवडाभरापूर्वी बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तुलशी भवन या चार मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील दोन मजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष ठार झाले. तर २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. तुलशी भवन ही इमारत खाली करण्यात आली असून ५ विंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त न झाल्याने येथील नागरिक अद्याप घराबाहेरच राहत आहेत.
दुर्घटना घडलेल्या इमारती शेजारील दर्शन दरबार येथे तात्पुरते वास्तव्य करत असून येथील नागरिक घरी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आठ दिवसांपूर्वी दुर्घटना घडलेली तुलशी भवन इमारत खाली करण्यात आली होती. या इमारतीमधील अनेक नागरिक शेजारीच असणाऱ्या दर्शन दरबार येथे वास्तव्यास आहेत, तर अनेकांनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतल्याची माहिती दर्शन दरबार येथे तात्पुरत्या स्वरुपात राहणाऱ्या नागरीकांनी दिली आहे. आम्हाला परत आमच्या घरी पाठवण्यात येणार का? असा प्रश्न घरी परतण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा : नवी मुंबई शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, नारळी पौर्णिमा निमित्त आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला उधाण
सारसोळे येथील आठ दिवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेत तुलसी भवन या संपूर्ण इमारतीचे महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. परंतु अद्याप स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या दुर्घटनेतील इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. बाबासाहेब राजळे यांनी म्हटले आहे.