नवी मुंबई : शहरात विशेषतः कोपरखैरणे आणि वाशीच्या वेशीवर गेल्या महिन्याभरापासून हवा गुणवत्ता निर्देशांक घसरत चालला असून २०० ते ३०० दरम्यान एक्यूआय आढळला आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांकडून वायू प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने धूळ शमन यंत्राचा उतारा शोधला आहे. कोपरखैरणे से.११ आणि वाशी से.२६ व २८ याठिकाणी आठवडाभर रात्रीच्या वेळी धूळ शमन यंत्रणेने (एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन) फवारणी करून प्रदूषित वातावरण कमी करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई शहरात महापे पावणे आणि तळोजा औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वसले आहे . शहरातील २५ टक्के भाग औद्योगिक क्षेत्राने व्यापला आहे . त्याच बरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. वाहनांमुळे ही हवा प्रदूषण होत असल्याचे निकष लावले जात आहेत. नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून वाशी आणि कोपरखैरणेच्या वेशीवर रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणावर धुरके निदर्शनास येत असून दर्पवासही येत आहे. त्यामुळे नित्याने याठिकाणाहुन रहिवाशांकडून हवा प्रदूषणाची ओरड सुरू आहे.

हेही वाचा :बहुप्रतिक्षीत नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते? ऑक्टोबरमधील ‘या’ तारखांची चाचपणी सुरू

याठिकाणी प्रदूषित वातावरणावर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून फिरते हवागुणवत्ता तपासणी वाहन तैनात केले आहे. या वाहन तपासणी अहवालातुन हवेत प्रदूषित घटक आढळले असल्याची तोंडी माहिती प्रदूषण मंडळाने दिली आहे. मात्र प्रदूषित घटकांची आकडेवारी देण्यासाठी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. दिवसेंदिवस येथील रहिवाशांच्या तक्रारी वाढत असल्याने येथील होणाऱ्या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिकेने धूळ शमन यंत्राचा पर्याय शोधला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai air purifier van to be deployed at vashi and kopar khairane to control air pollution css