नवी मुंबई : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत धडकणार असून २५ तारखेचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. त्यांची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात येणार असल्याने एपीएमसीच्या पाचही बाजार पेठात दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत, असे परिपत्रक एपीएमसी प्रशासनाने काढले आहे.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा मार्फत आयोजित केलेल्या मराठा आरक्षण दिंडीच्या अनुषंगाने मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारात लाखो समाज बांधवांचा मुक्काम करावयाचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पाचही बाजार आवारे २५ ला बंद ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. मोर्चाच्या अनुषंगाने बाजार समितीच्या विविध बाजार आवारात व्यापारी/बाजार घटकांना शेतीमालाचा व्यवहार करणे तसेच शेतीमालाच्या वाहनांना बाजार आवारात प्रवेश करणे शक्य होणार नसल्याने २५ तारखेला बाजार समितीची पाचही बाजार आवारे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा : जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी मराठा संघटनांची नवी मुंबईत जय्यत तयारी
गुरुवारी त्यामुळे बाजार आवारात कोणतेही शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीत, याबाबत बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकरी, वाहतूकदार, आयात निर्यात संबंधित सर्व घटकांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हेच आवाहन बाजार आवाराचे असोसिएशन्स यांचे समवेत समन्वय साधून सर्व संबंधित व्यापारी/बाजार घटकांना याबाबत ध्वनिक्षेपकद्वारे अवगत करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : उरण शहरात श्रीरामाच्या जल्लोषात भव्य शोभायात्रा
गुरुवारी (ता. २५ ) सकाळी आठ नंतर उघड्यावर राहणार नाही, याची दक्षता व्यापारी, अडत्ये , मालधनी यांनी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तसेच बाजार आवारात मराठा बांधवांना शिल्लक शेतीमाल/कचरा आदी मुळे कोणताही त्रास होऊ नये आणि स्वच्छता राखावी अशी सूचना केली गेली आहे.