नवी मुंबई : मित्राच्या स्कुटीला धडक दिल्याचा राग अनावर झाल्याने पाच सहा जणांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सानपाडा येथे घडला आहे. या प्रकरणी स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपी आणि फिर्यादी यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
दिग्विजय शेळके असे यातील आरोपीचे नाव असून तोच स्कार्पिओ चालवत होता. सानपाडा सेक्टर एक येथे अखिलेश कुंदर , आयुष पाटील, युगांत वास्कर, मीट पाटील समर पाटील, निहाल इंदुलकर आणि सिद्धेश कांबळे हे एकमेकांच्या परिचित असलेले सहज भेटण्यास किचन डिलाइट हॉटेल जवळ रस्त्यावर एकत्र जमले होते. यातील आयुष हे थोडे उशिरा स्वतःची कार घेऊन आले असता त्यांच्या गाडीला एका अनोळखी स्कुटी चालकाने धडक मारली.त्यावरून बाचाबाची सुरु झाली. स्कुटी चालकाने त्याचा मित्र यातील आरोपी दिग्विजय शेळके याला बोलावले. शेळके हा स्कार्पिओ घेऊन आला आणि उपस्थित असलेले लोक मित्राशी वाद घालतात हे लक्षात आले त्यावेळी त्याने मागेपुढे न पाहता सर्वांच्या अंगावर गाडी घातली. गाडी वेगात येत असल्याचे लक्षात आल्यावर सर्व जणांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळाले. तरीही गाडी परत घेत त्याने पुन्हा तेच कृत्य केले. आणि जाता जाता शिवीगाळ करून धमकी देत निघून गेला. या घटनेत फिर्यादी कुशल कुंदर याच्या उजव्या अंगठ्याजवळ जखम झाली. युगांत वास्कर याच्या हाताला स्कार्पिओ गाडीचा आरसा लागून मार बसला तर अन्य दोघांना किरकोळ मार लागला. हि घटना ३१ तारखेला रात्री साडे अकराच्या दरम्यान घडली मात्र फिर्यादी हे सुरवातीला घाबरले होते मात्र शुक्रवारी त्यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा :नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
याच प्रकरणी एकत्र मिळून धमकी आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला . स्कुटी चालक मित्राला दमदाटी करत असल्याचे कळल्यावर भांडण सोडवण्यास गेलो मात्र सर्व आरोपींनी मारण्याचा प्रयत्न केला तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असा आरोप करीत दिग्विजय शेळके याने अखिलेश कुंदर आणि इतरांच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे पोलिसांनी कुंदर आणि इतरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.