नवी मुंबई : अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला होता, बाजारात आता स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात आता तीन हजार क्रेट दाखल होत आहेत. एपीएमसी घाऊक बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढत असल्यामुळे त्यांचे बाजारभाव उतरलेले पाहावयास मिळत आहे. मागील महिन्यांत ५०० ते ६०० रुपये प्रतिकिलो मिळणारी स्ट्रॉबेरी आता १४० ते २४० रुपये प्रतिकिलो उपलब्ध आहे.
वाई, पाचगणी, महाबळेश्वर तसेच नाशिक येथे ‘स्ट्रॉबेरी’ पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आता नाशिक मध्ये हे स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतले जात आहे. एपीएमसी बाजारात पाचगणी महाबळेश्वर येथील तीन हजार क्रेट नाशिक येथील १०ते १२ गाड्या स्ट्रॉबेरी दाखल होत आहेत. सध्या स्ट्रॉबेरी आवक वाढत आहे, त्यामुळे दरात घसरण झाली आहे. स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येत असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस आणि हवामानबदल यामुळे हंगामालाही उशिरा सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
आवक वाढत असल्याने बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत दर आवाक्यात आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक स्ट्रॉबेरी चवीला आंबट असल्याने जास्त मागणी नाही, त्यामुळे नाशिक स्ट्रॉबेरी एक पनेट म्हणजे दोन किलो स्ट्रॉबेरी १२० ते १८० रुपयांनी विक्री होत आहे.
स्ट्रॉबेरी खाण्याबरोबरच आयस्क्रीम, शीतपेय, चॉकलेट यामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी फ्लेवरचा उपयोग होतो. त्यामुळे बाराही महिने स्ट्रॉबेरी ला मागणी असते. विशेषतः हंगामादरम्यान अधिक मागणी असते. त्यामुळे महाबळेश्वर व वाई परिसरात कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. नाशिकमध्येही लागवड केली जात आहे.