नवी मुंबई : बेलापूर येथे तयार असलेल्या बहुमजली पार्किंगची सुविधा कार्यान्वित करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात बेलापूर येथील बहुमजली पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील पार्किंगसाठी सीबीडी बेलापूर येथील सेक्टर १५ येथे भूखंड क्र. ३९ या ४७०५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर बहुमजली पार्किंग सुविधा विकसित करण्यात आली आहे. काही कालावधीतच हा वाहनतळ लोकांच्या वापरासाठी खुला होऊन या परिसरातील वाहनतळाची समस्या मोठया प्रमाणात मार्गी लागणार आहे.
या ठिकाणी ३९६ चारचाकी व १२१ दुचाकी वाहनांच्या अशी एकूण ५१७ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. एकीकडे बेलापूर येथे पार्किंगची सुविधा तयार झाली असून सीबीडी सेक्टर १५ येथे भूखंड क्रमांक ७२ या ठिकाणी ६९०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर ३० ए, वाशी येथे हॉटेल तुंगासमोरील ११ हजार ३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या भूखंडांवरील वाहनतळ शासन व खाजगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याच्या पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.
हेही वाचा : पनवेलमध्ये खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ
बेलापूर सेक्टर १५ येथील बहुमजली पार्किंग सुरु करण्याबाबत लवकरच निविदा मागवून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पाटील यांनी लोकसत्ताला दिली. आगामी काळात पार्किंगची समस्या वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील पार्किंग समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली असून याबाबत नुकतीच आढावा बैठका घेत विभागनिहाय पार्किंग प्लॉट विकसित करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
हेही वाचा : सिडकोची अभय योजना: अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काची रक्कम ३१ मार्चपर्यंत भरल्यास ५० टक्के सवलत
“वाहनतळाचे नियोजन करताना सध्या असलेल्या वाहनांच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच आगामी कालावधीत वाढणाऱ्या संभाव्य वाहनांच्या संख्येचाही विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहनतळांचे दर परवडणारे असावेत तसेच शहरात विविध ठिकाणी वाहनतळाचे नियोजन करावे व सर्वेक्षण करून वेगवान कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” – राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका