उरण : नेरुळ/ बेलापूर मार्गाला उरणच्या प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र येथील खारकोपरदरम्यानच्या उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व शेमटीखार या चारही स्थानकांत अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. येथील अपूर्ण कामांमुळे नागरिकांनी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. उरण ते नेरुळ आणि बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे. यामध्ये उरण स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. स्थानकाच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तर द्रोणागिरी स्थानक हे बोकडवीरा गावाच्या हद्दीत आणि गावालगत असतानाही बोकडवीरा गावातील प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही. पुढील न्हावा शेवा (नवघर) स्थानकाच्या पश्चिमेला जाण्यासाठी असलेला मार्ग नादुरुस्त आहे. सिडकोच्या सेक्टर ११ मधून जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तर पूर्वेला तिकीट घर नसल्याने प्रवाशांना पागोटे, द्रोणागिरी, नवघर, भेंडखळ तसेच खोपटे खाडीपलीकडील गावातील प्रवाशांना जिने चढून यावे-जावे लागत आहे.
हेही वाचा : पनवेलमध्ये खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ
या स्थानकांत बसविण्यात आलेले सरकते जिने बंद आहेत. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. अशीच स्थिती शेमटीखार (रांजणपाडा) या दोन्ही स्थानकांत प्रवाशांना पायऱ्या चढून फलाटावर जावे लागत आहे. “अपुऱ्या सुविधांची माहिती घेऊन अपूर्ण कामांसंबंधी त्या त्या विभागाला कळविण्यात येणार आहे”, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली.