नवी मुंबई : मार्गक्रमण करीत असताना अचानक काही व्यक्ती रस्ता ओलांडत असल्याने बस चालकाने ब्रेक दाबला. त्यात सुरक्षित अंतर न ठेवल्याने मागून येणाऱ्या कारने बसला जोरदार धडक दिली. मात्र या अपघातानंतर कार चालकाने गाडीतील तलवार काढून बस चालकाला धमकी शिवीगाळ करीत चालक दरवाजावर तलवारीचे वार केले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सनी लांबा असे यातील फिर्यादीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एन.एम.एम.टी बसचा मार्ग क्रमांक ३१ ( कोपरखैरणे ते उरण ) ची बस कोपरखैरणेच्या दिशेने जात होती. वाशी सेक्टर दहा येथील बस थांब्यावरील प्रवासी सोडून पुढे निघाली असता अचानक काही लोकांनी रस्ता ओलांडला . त्यामुळे बस चालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. त्यात मागून येणाऱ्या कार चालकाला गाडी थांबवता न आल्याने त्याची कार बसला मागून धडकली. अचानक ब्रेक मारल्याने गाडीचे नुकसान झाल्याचा राग येऊन कार चालक सनी लांबा याने कार मधील तलवार काढून बस चालकाच्या अंगावर धावून गेला. मात्र बस चालक खाली उतरला नाही आणि चालक दरवाजा बंद असल्याने चालक वाचला . मात्र लांबा याचा राग अनावर झाल्याने त्याने चालक दरवाजवरच जोरजोरात तलवारीचे वार केले. त्यात त्याची तलवार वाकडीही झाली. या गोंधळाने प्रचंड वाहतूक असलेल्या संथ वाहतुकीत वाहतूक कोंडीची भर पडली. याबाबत कळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा… उरण न्यायालयात ई-फाईलींग प्रणाली सुरू, केंद्राचे उद्घाटन
हेही वाचा… नवी मुंबई : एसटी बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून लूट
बस चालक सूर्यकांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून लांबा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.