नवी मुंबई : टेलिग्राम द्वारे लोकांशी संपर्क साधून विविध बेबसाइटवरील टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट ) असून एका खाजगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहे. आकाश उमेश पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील फिर्यादी टेलिग्रामद्वारे आरोपीच्या संपर्कात आले.
फिर्यादींना विविध वेबसाईट वरिल टास्क पुर्ण केले नंतर जास्तीचे कमिशन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन पध्दतीने टप्याटप्याने पैसे भरण्यास सांगितले. मोठे कमिशन मिळेल या आशेपायी त्यांनी एकूण १७ लाख ६२९ रुपये भरले. मात्र पुढे काहीच झाले नाही आणि संपर्कही बंद झाला. त्यामुळे फिर्यादी यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी तात्काळ फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला.
हेही वाचा : पनवेल आणि उरणमध्ये ‘महाविकास’ची आघाडी
गुन्हयात वापरलेले बँक खाते व मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संशयीत इसमाचे लोहगाव, पुणे येथे वास्तव असल्याची माहिती प्राप्त झाली. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु आलदर व पथक यांनी लोहगाव, पुणे येथे जाऊन आरोपीताचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले व चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : वाढत्या वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना मुखपट्टी लावण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन
आरोपीचा महाराष्ट्र राज्यामधील ०४ तसेच इतर राज्यातील २१ सायबर तक्रारीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा मुळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा असुन उच्चशिक्षीत आहे. लोहगाव, पुणे येथे चांगल्या कंपनीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणुन काम करत असून आरोपी फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरन्सी USDT मध्ये स्वीकारत होता. तसेच आरोपी त्याच्या दिल्ली येथील इतर साथीदारांशी संपर्कात होता. फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खात्यांना गोठविण्याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून सदर बँक खात्यांमध्ये एकुण ५ लाख ९० हजार ५९० रुपये रक्कम गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.