उरण : सोमवारी (२५ सप्टेंबर) स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्म्यांचा ९३ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. स्वातंत्र्यलढयात बलिदान देणाऱ्या १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मारकांची पडझड व स्मारक परिसरातील अतिक्रमण तसेच दुरवस्थेकडे शासकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्मारकांची दुरवस्था झाली आहे. उरण तालुक्यात एकूण सात स्मारके आहेत. मात्र या स्मारकांची जबाबदारी आपल्याकडे नसल्याची महिती सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी दिली आहे.
ही स्मारके शासकीय आहेत. मग कोणत्याही विभाकडे जबाबदारी का नाही? असा सवाल नागरिक करीत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर, दिघोडे, मोठीजुई, कोप्रोली, पाणदिवे आणि खोपटे व धाकटी जुई या गावात ही स्मारके आहेत. ब्रिटीश सत्तेविरोधात उरण, पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने जंगल सत्याग्रह आंदोलन उभारले होते, यावेळी ब्रिटीश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलन कर्त्यांवर बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर ( कोप्रोली), रामा बामा कोळी ( मोठी जुई), आनंदा माया पाटील ( धाकटी जुई) परशुराम रामा पाटील ( पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे) या आठ आंदोलनकर्त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते. तसेच ३८ आंदोलक जखमी झाले होते.
हेही वाचा : ‘इंडियन स्वच्छता लीग २’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे ३ ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’
त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या या चिरनेर जंगल सत्याग्रहाला विशेष महत्व प्राप्त झाले. या गौरव व तेजस्वी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी १९८० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी राज्यभरात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांची शासकीय स्मारके उभारली आहेत. या स्मारकांची रचना उत्तम आहे. यामध्ये मंच, वाचनालय, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था आहे. मात्र शासनाकडून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चिरनेर येथील स्मारक वगळता उरणमधील सर्वच स्मारकांची सिलिंग तुटली आहे. लाद्या उखडल्या आहेत. काही स्मारकांचे दरवाजे गायब आहेत.
हेही वाचा : दुचाकीवरून घसरून पडलेल्या युवकाला मदत करणाऱ्या पोलिसालाच कारने उडवले, चालकावर गुन्हा दाखल
स्मारकांच्या स्तंभावर कपडे वाळत घातले जात आहेत. अनेक ठिकाणी तर घरातील टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी स्मारकांचा वापर सुरू आहे. स्मारक परिसरात अनेक वस्तू वाळविण्याचे काम केले जाते. स्मारकांची वेस नष्ट झाली आहे. काही ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. अशी या स्वातंत्र्य लढ्यातील स्मृती स्थळांची दुरावस्था झाली आहे.
शासकीय जबाबदारी कोणाची?
हुतात्म्यांच्या गावी महाराष्ट्र शासनाने ही स्मारके उभारली आहेत. याचे बांधकाम हे बांधकाम विभागाने केले आहे. मात्र त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमच्याकडे नसल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार यांनी दिली आहे. तर जिल्हा परिषदेकडून २५ सप्टेंबरच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीला निधी दिला जातो. मात्र स्मारकांच्या देखभालीची जबाबदारी आमची नाही, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत यांनी व्यक्त केले आहे.