पनवेल : अवघ्या दहा मिनिटांत पार करता येईल असा खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर) च्या कामास लवकरच सुरुवात होणार असून यासंदर्भातील कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. नुकतेच हे काम कंत्राटदार कंपनीस २०९९ कोटी रुपयांना करण्याचे कार्यादेश दिले आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर खारघर तसेच तळोजा येथील रहिवाशांची मोठी सोय होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मार्ग कधी बांधला जाईल याकडे नवी मुंबईसह खारघर आणि तळोजावासियांचे लक्ष लागले होते.
‘केटीएलआर’ मार्गाची एकूण लांबी ५.४९ किलोमीटर असून यामध्ये खारघर वसाहत आणि तुर्भे औद्याोगिक वसाहत या दरम्यानच्या पारसिक डोंगररांगा पोखरून १.७६ किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. केटीएलआरमुळे तुर्भे, नेरुळ, जुईनगर, वाशी या परिसरांतून खारघरमध्ये अवघ्या १० मिनिटांत पोहोचणे शक्य होऊ शकेल.
हेही वाचा…पनवेलमधील भारतनगर झोपडपट्टीत राहणा-या बांगलादेशीय नागरिकांना ताब्यात घेतले
या मार्गिकेसाठी ऋत्विक प्रोजेक्ट्स व एव्हरास्कॉन (जेव्ही) या कंपनीची निवड मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सिडको मंडळाच्या संचालकांच्या बैठकीत करण्यात आली होती. केटीएलआर हा मार्ग शीव-पनवेल महामार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकासमोरून सुरू होऊन खारघरच्या गुरुद्वारा आणि सेंट्रल पार्क येथील जंक्शन तसेच खारघर कॉर्पोरेट पार्क या परिसराला जोडला जाईल, अशी माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकारी प्रिया रातांबे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा मार्ग बांधण्यासाठी कंत्राटदार कंपनीला चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. केटीएलआरमुळे शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच या मार्गामुळे खारघर उपनगरातील वाहनचालकांना वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिसरे प्रवेशव्दार मिळणार आहे. सध्या वसाहतीमध्ये सकाळी नऊ ते दहा या वेळेत आणि सायंकाळी सात ते आठ या वेळेत उत्सव चौक ते सेंट्रल पार्क चौकापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
केटीएलआर सुरू झाल्यास खारघरवासियांसोबत तळोजातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केटीएलआरवर ये-जा करण्यासाठी चार वेगवेगळ्या मार्गिका असतील. यामुळे खारघर येथील व्यावसायिक कॉर्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स, फुटबॉल ग्राऊंड, सेंट्रल पार्क यांपर्यंत मुंबई व नवी मुंबईतील इतर उपनगरातील रहिवाशांना काही मिनिटांत विना कोंडीचा प्रवास करून पोहचता येईल.
हेही वाचा…पनवेलकरांची पाणी टंचाईची समस्या निकालात निघणार…
दोन्ही मार्गांवर ताण
खारघरमध्ये प्रवेशासाठी बेलापूर भारती विद्यापीठ मार्गे आणि शीव-पनवेलहून थेट प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. खारघर आणि तळोजा या दोन्ही उपनगरांमध्ये जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने या मार्गावरील ताण वाढला आहे.