नवी मुंबई : एपीएममसी कडून तुर्भे नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाला खालच्या बाजूने तडा गेल्याने वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. १९९८ मध्ये सिडकोने सदर उड्डाण पुलाची बांधणी केली होती. केवळ २६ वर्षात पुलास तडे गेल्याने दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.

वाशी एपीएमसी कडून तुर्भे नाका कडे वळण घेत जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील प्रि कास्ट बीम बेंड झाले आहे. त्यामुळे लोखंड वापरून काँक्रीट केलेल्या प्लेट्स मध्ये फटी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात आल्यावर नवी मुंबई मनपाच्या स्थापत्य विभागाने पुलाची  पाहणी केली. कुठलाही अपघात होऊ नये म्हणून वाहतूक बंद करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक पोलिसांना देण्यात येताच या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा : नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 

याला पर्यायी रस्ता म्हणून तूर्तास सानपाडा ते तुर्भे हा उड्डाणपूल मार्ग आणि हलक्या वाहनास हाच मार्ग वा पामबीच मार्ग सुचवण्यात आला आहे. आज शनिवार मुळे वाहतूक कमी तर रविवारी एपीएमसी बंद असल्याने या मार्गावर वाहतूक अजून कमी असणार आहे. ही काहीशी उसंत पथ्यावर पडली असून या दरम्यान पुलाची पूर्ण तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा : पनवेलमध्ये सकाळपासून जोरधारा

सदर पुल धोकादायक झाल्याचे अद्याप स्पष्ट नाही पुलाच्या वरील भागात पूल पूर्ण मजबूत जाणवतो मात्र दुर्दैवी अपघात घडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे असे वाहतूक पोलीस आणि मनपाने स्पष्ट केले आहे.