पनवेल : शुक्रवारी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते. पोलीसांच्या तपासात मयंक यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सूरु असल्याचे उजेडात आले. याविषयी तपास सूरु असल्याने लगेच यावर बोलणे योग्य होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी सांगीतले. मयंक यांची मोटार त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती.
हेही वाचा : जुने आले खातेय जादा भाव, घाऊकमध्ये जुने आले २०० पार तर नवीन आले ७५ रुपयांवर
खारघर येथील तळोजा तुरुंगाजवळील तलावात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. तीन घटनांमध्ये मागील तीन महिन्यात पहिले एकाचा त्यानंतर दोघांचे जीव गेल्याची माहिती या विभागात राहणारे शिवसेनेचे महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी दिली. या तलावाशेजारी गाडी धुणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच अनेक पर्यटक किंवा वर्षासहलीसाठी या तलावात पाण्याचा अंदाज न घेता अनेक युवक पोहतात. या तलावाला संरक्षण कुंपण घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.