नवी मुंबई : एकीकडे अटल सेतुमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाशी खाडी पुलावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला असताना ऑक्टोंबर महिन्यात सुरू झालेल्या वाशी खाडी पुलावरील तिसऱ्या उड्डाणपुलावरील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाला आहे. परंतु सततच्या वाढत्या वाहनांमुळे व दोन्ही दिशेकडील उड्डाणपुलाच्या कामांमुळे वाहतूक वळवल्यामुळे वाहतूकचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई वाशी खाडी पुलावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन १३ ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. वाशी खाडी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन नवे खाडी पूल तयार करण्याच्या नियोजनानुसार एका खाडी पुलाचा वापर सुरु झाला आहे. वाशी खाडी पुलावर सुरु असलेल्या प्रत्येकी ३ लेनच्या दोन पुलापैकी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा पुल सुरु झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतू त्यानंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेवर संबंधित एल अॅन्ड टी कंपनीचा आरएमसी प्लांटच्या ठिकाणी काम सुरु केले. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱी वाहतूक ही मानखुर्द पासून ५ लेनवरुन येऊन पुढे उड्डाणपुलाच्या सुरुवातीला ती वाहतूक जुन्या पुलावरच जात असल्याने फक्त २ लेनमध्ये जात असल्याने उड्डाणपुलाच्यापूर्वीच प्रचंड वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी अगदी मानखुर्द सिग्नलपर्यंत होत असल्याने मानखुर्द ते वाशी उड्डाणपुलापर्यंत ५ मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना ४० ते ४५ मिनिटापर्यंत वाहतूककोंडीचा दैनंदिन त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही वाहतूककोंडी सुटण्यासाठी मोठी अडचण होते. त्याच ५ लेनची वाहतूक २ लेनमध्ये वर्ग होताना गाडी बंद पडणे, गाडी दुसऱ्या गाडीला घासणे असे प्रकार घडत असल्याने वादामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे पाहायला मिळते. एल ॲन्ड टी कंपनीने आरएमसी प्लान्ट काढून त्या ठिकाणी उड्डाणपुलावर उर्वरित रस्त्याचे काम सुरु केल्याने हे पुणे दिशेकडे जाणारे काम पूर्ण झाल्याशिवाय वाहनचालकांची सुटका होणार नसल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती वाशीवरुन मुबंईकडे जाताना तिसऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे सकाळी मुंबईच्या दिशेने जाताना तर सायंकाळी मुंबईहून वाशीच्या दिशेने येताना दोन्ही बाजुला वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
वाशी खाडीवर तयार झालेला मुंबईहून पुण्याकडील एक पुल सुरु झाला पण अर्धवट कामामुळे नव्या पुलावर जाण्यासाठी वळण दिल्यामुळे सतत वाहतूककोंडी होते. त्यामुळे वेळ वाया जातो. वाहतूक कोंडीतून लवकर दिलासा मिळावा हीच आशा आहे.
विजय पाटील, वाहनचालक
मुंबईहून पुण्याकडे जाणारा उड्डाणपुल सुरू झाला पण आरएमसी प्लान्टच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. उड्डाणपुलावर दोन्ही दिशेला सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. पुलांचे काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होणे शक्य नाही. सातत्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. ५ मार्गिकेची वाहतूक २ मार्गिकेत वर्ग करताना अनेक समस्या येतात.
दिलीप गुजर, वाहतूक पोलीस वाशी टोलनाका