नवी मुंबई : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केवळ दोन मिनिटे उशीर झाल्यामुळे आठ विद्यार्थ्यांना ज्युडिशियरीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना नवी मुंबईतील सीबीडी येथे घडली. याच परिसरात एकाच नावाच्या दोन शैक्षणिक संस्था असून ऑनलाईन नकाशा पाहून काही विद्यार्थी परीक्षा नसलेल्या केंद्रावर पोहचले होते. नवी मुंबईतील सीबीडी येथील पीपल एज्युकेशनच्या शाळेत परीक्षा घेण्यात आली. मात्र पीपल एज्युकेशन नावाच्या दोन शाळा बेलापूरमध्ये असल्याने अनेक परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी दुसर्याच शाळेत जाऊन पुन्हा परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत आले. या धावपळीत आठ विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी दोन मिनिटे उशीर झाला. त्यांनी परीक्षेला बसू द्यावे यासाठी विनवण्या केल्या. मात्र बंद केलेले गेट परीक्षा घेणार्या अधिकार्यांनी उघडले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीशांच्या ११४ जागा भरण्यासाठी आज पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून बेलापूर येथील सेक्टर १ मधील पीपल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेची निवड करण्यात आली होती. परीक्षेची वेळ सकाळी दहाची होती. त्यासाठी परीक्षार्थींना मात्र सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा केंद्रावर येणे आवश्यक होते. पीपल एज्युकेशनच्या बेलापूरमध्ये दोन शाळा आहेत. एक शाळा सेक्टर आठ तर परीक्षा केंद्र असलेली शाळा सेक्टर एकमध्ये आहे.
हेही वाचा : ओएनजीसी तेल गळतीमुळे उरणमधील किनारा बाधीत; मच्छिमारांचे पंचनामे करण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची मागणी
अनेक विद्यार्थी सेक्टर आठच्या शाळेत गेले. त्या ठिकाणी केंद्र नाही असे लक्षात आल्यानंतर पुन्हा सेक्टर एकच्या शाळेत परीक्षा केंद्रावर आले. या गडबडीत आठ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास दोन मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना पेपरला बसता आले नाही. अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली तर प्रशासनाने बोलण्यास नकार दिला. या केंद्रावर आज राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
हेही वाचा : कोकणवासीयांना अतिरिक्त शुल्क आकारणी केल्यास कारवाई; नवी मुंबई आरटीओचे खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रक जारी
परीक्षा केंद्रावर गोंधळ
एकाच नावाच्या दोन शाळांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या धावपळीत पाच विद्यार्थिनी आणि तीन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेला प्रवेश देण्यासाठी एमपीएससीच्या अधिकार्यांनी नकार दिला. आमच्या मुलांच्या भविष्याबरोबर खेळू नका, अशी विनंती पालकांनी केली. मात्र अधिकार्यांनी काहीएक ऐकले नाही. पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाल्याने परीक्षा केंद्राच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.