नवी मुंबई : नवी मुंबई ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या विरोधात पक्षाचे उपनेते विजय नहाटा यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. नाईक यांच्याविरोधात उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव होता. त्यामुळे चौगुले यांनी उमेदवारी मागे घ्यावी असा आग्रह शिंदेसेनेतील ठाण्यातील नेत्यांनी धरला होता. त्यानंतरही उमेदवारी कायम ठेवत चौगुले यांनी नाईक यांना आव्हान दिले आहे.

नवी मुंबईत भाजपने ऐरोलीतून गणेश नाईक यांना तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच नाईक यांचे धाकटे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संदीप एकीकडे बंड करत असताना गणेश नाईक यांनी मात्र ऐरोलीतून भाजपमधून लढण्याचा निर्णय कायम ठेवत महायुतीतील आपल्या विरोधकांची विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी केल्याचे पहायला मिळाले. नाईक पिता-पुत्रांचा हा वेगवेगळ्या पक्षातून लढण्याचा पॅटर्न राज्यभर चर्चेत असताना बेलापूर आणि ऐरोलीतून शिंदे सेनेचे विजय नहाटा, विजय चौगुले या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकाविले होते. विजय नहाटा यांच्या उमेदवारीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा संदीप यांनाच मिळेल अशी चर्चा सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी प्रयत्न करुन पाहिले. मात्र नहाटा यांनी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. बेलापूर मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी अटळ मानली जात असताना ऐरोलीतही शिंदेसेनेचे विजय चौगुले यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदेसेनेचे अपक्ष असा सामना रंगणार आहे.

हेही वाचा : ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल

गणेश नाईकांविरोधात चौगुले पहिल्यांदाच रिंगणात

नवी मुंबईत गणेश नाईक, विजय चौगुले या एकेकाळच्या गुरुशिष्यांमध्ये गेली १५ वर्ष विस्तवही जात नाही. एकसंघ शिवसेनेतून चौगुले यांचा यापुर्वी दोन वेळा नाईकांचे पुत्र संदीप यांनी पराभव केला आहे. पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघातून नाईक स्वत: रिंगणात उतरले. तेव्हा मात्र चौगुले यांनी त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. असे असले तरी मागील पाच वर्षांत नाईक आणि चौगुले यांचे संबंध ताणलेलेच राहिले. नवी मुंबईतील किमान एक मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी मागणी करत चौगुले यांनी नाईक यांना यापूर्वीच जाहीर विरोध केला होता. गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल केलेला उमेदवारी अर्ज चौगुले मागे घेतील का याविषयी येथील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना संपर्कही साधला जात होता. मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील कट्टर समर्थक राम रेपाळे यांच्यावर चौगुले यांची मनधरणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र चौगुले यांनी उमेदवारी कायम ठेवत नाईक यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस 

महाविकास आघाडीतही बंड

बेलापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे पदाधिकारी मंगेश आमले यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने येथे महाविकास आघाडीतही बंड झाले आहे. आमले हे पुणे जिल्ह्यातील असून बेलापूर मतदारसंघात या भागातील असलेल्या मतांचा भरणा लक्षात घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार यांना मानणारा एक मोठा मतदार हा या मतदारसंघात असल्याने हा मतदार विभागला जाऊ नये याची दक्षता संदीप नाईक यांना घ्यावी लागणार आहे.