नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा तुर्भे एमआयडीसी येथे असलेला शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देशातील उत्तम प्रकल्पांपैकी मानला जातो. येथील घनकचऱ्यावर विविध प्रक्रिया करून खतासह अनेक गोष्टी तयार केल्या जातात. आता या कचऱ्यापासून वीज आणि गॅसनिर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आुयक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शिंदे यांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळाची बारकाईने पाहणी केली. हे प्रकल्पस्थळ नवनवीन तंत्रप्रणाली राबवित अधिकाधिक अत्याधुनिक करण्यासाठी आयुक्तांनी हे आदेश दिले.

या ठिकाणी असलेले बांधकाम व पाडकाम घनकचरा प्रक्रिया स्थळ अधिक उत्तम व सक्षम करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही जलद करावी तसेच यामध्ये सामाजिक सहभागाचा अंतर्भाव करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच त्याठिकाणी निर्माण होणारे क्रशिंग सँड, विविध आकाराची रेती व खडी, पेव्हर ब्लॉक असे बांधकाम साहित्य महापालिका कामांमध्ये कंत्राटदारांनी वापरावे यादृष्टीने नियमावली करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

शहरातील घनकचऱ्यावर कशा पध्दतीने शास्त्रोक्त प्रक्रिया होते याची नागरिकांना विशेषत्वाने लहान मुलांना माहिती व्हावी यादृष्टीने शालेय विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी आणून त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने माहिती करुन द्यावी अशी सूचनाही आयुक्तांनी दिली.

एकीकडे मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा पालिकेचा प्रय़त्न असताना दुसरीकडे क्षेपणभूमीवर वीजनिर्मिती व गॅसनिर्मितीबाबतही पालिका प्रयत्नशील आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश सुपर स्वच्छ लीगमध्ये झालेला असून नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्यासाठी लोकसहभागातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळावरील प्रक्रिया ही महत्वाची असून त्यादृष्टीने आयुक्तांनी प्रकल्पस्थळावरील अंतर्गत स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश दिले.

कचऱ्यापासून खत, आरडीएफ आणि बरेच काही…

-नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज साधारणत: ७५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. तुर्भे येथील महानगरपालिकेच्या शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी आणून त्यावर प्रक्रिया करण्यात येते.

-त्यामधील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते.

-सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ बनवून रासायनिक उद्योग, सिमेंट उद्योग, थर्मल पॉवर स्टेशनला दिले जाते.

-नारळाच्या रिकाम्या शहाळ्यांपासून कोकोपीट वेगळे काढले जाते. त्याच उपयोग नर्सरी व फुलबागा या ठिकाणी होतो. फायबर वेगळे करुन त्याचाही उपयोग गादीच्या कुशनमध्ये व मूर्ती बनविण्यासाठी केला जातो. त्यासोबतच काथ्याची निर्मितीही करण्यात येते.

-एमआरएफ रिसायकलींग इंडस्ट्रीला पाठविले जाते.