नवी मुंबई : नवी मुंबई लगत शिरवणे आद्योगिक वसाहतीतील शुभदा कंपनीत शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. ही आग शनिवारी साडे दहा पर्यंत सुरू होती. आगीवर अद्याप नियंत्रण मिळाले नसले तरी कोणी जखमी झालेले नाही.
शिरवणे आद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक ५०६ येथे असलेल्या शुभदा पॉलिमर प्रॉडक्ट्स प्रा.लि. या प्लास्टिक पासून विविध वस्तू निर्माण करणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. अग्निशमन दलास रात्री ११:२८ चा कॉल होता. .आगीत मोठं नुकसान झाले आहे. प्लास्टिक वस्तू निर्मिती साठी लागणारी प्लास्टिक पावडर आणि त्याला लागणारे विविध रसायने असे आग पटकन पकडणारे साहित्य असल्याने काही वेळातच आग पूर्ण कंपनीत पसरली . त्यात रेझिन नावाचा रासायनिक द्रव मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझली तरी पुन्हा पुन्हा पेट घेतला जात आहे. फोमिंग सुद्धा निरुपयोगी ठरत असल्याने सातत्याने पाण्याचा मारा करून रेझिन थंड करावे लागत आहे. सकाळी सात पर्यंत कंपनीच्या एका भागातील आग विझवली असून आता उर्वरित भागातील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग विझवण्यासाठी सिडको, एमआयडीसीतील तीन अग्निशमन केंद्र तसेच कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, ऐरोली सीबीडी पनवेल अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अद्यापही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीत स्वतःची आग रोधक यंत्रणा होती की नाही हे आता सांगू शकत नाहीत. अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विजय राणे यांनी दिली.