नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. यंदा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकरता आकारले जाणारे मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.

पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला असून अशाच प्रकारची मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, विविध लोकप्रतिनिधी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्याकडूनही करण्यात आली होती. त्यास अनुसरून आयुक्तांनी शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १७३ / २०१० संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारण्याची परवानगी देण्याची ‘ई सेवा संगणक प्रणाली’ सुरू केली असून १९ ऑगस्ट पासून मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवाना प्राप्त करून घ्यावयाचा असून त्याकरता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु परवानगी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ऐरोलीतील पोस्टाचे स्वयंचलित पार्सल हब केंद्र कधी?

१९ ऑगस्टपासून या ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात झाली असून गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदरपर्यंतच ऑनलाईन परवानगी प्रणाली सुरू राहील याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. मंडप उभारणी परवानगीकरिता अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे http://www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय उत्साहात पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader