उरण : समुद्राच्या उधाणामुळे शेतीची बंदिस्ती फुटल्याने येथील शेकडो एकर पिकलेल्या भात शेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. या बांधाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम खारलँड विभागाने सुरू केले आहे. मात्र कायमस्वरूपी बांधाच्या मजबुतीचे काम नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. जमिनीच्या संरक्षणासाठी असलेले बांध फुटल्याने उरणमधील पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांग पाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उध्वस्त झाली आहे. आधी पावसाच्या पुराने तर आता समुद्राच्या कहराने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नापिकीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा : शुक्रवारपासून मोरा मुंबई जलमार्गावरील तिकीट दर २५ रुपयांनी कमी होणार, मात्र उरण ते अलिबाग जलप्रवास महागण्याची शक्यता

उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडी किनाऱ्यावरील शेती करीत आहेत. मात्र या परिसरात होणाऱ्या औद्योगिकरणामुळे मिठाचा व्यवसाय संपुष्टात आला आहे. त्यात खारलँड विभागाने उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या मजबुतीची कामे न केल्याने भात शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्वस्त होत आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन भात शेती वाचविण्यासाठी बंदिस्तीचे मजबुतीकरण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत खारलँड विभागाने या नादुरुस्त बांधाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

Story img Loader