नवी मुंबई : शहरात मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे गणपती सणापूर्वी बुजवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असले तरी कोपरखैरणे विभाग कार्यालय इमारत आवारात प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पाऊस पडून थांबला तरी दिवसभर आवारात तळे साचलेले असते. यामुळे विभाग कार्यालयात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

इमारतीत असणाऱ्या इतर आस्थापनांनी प्रतिक्रिया दिली नाही. नवी मुंबईतील आठ नोडपैकी कोपरखैरणे नोडमध्ये पदपथांची अवस्था दयनीय झाली आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र गेले अनेक महिने कोपरखैरणे नोडचा गाडा ज्या इमारातीतून हाकला जातो त्या इमारतीच्या आवारात प्रचंड खड्डे पडले आहेत. वाहनतळामधून वाहन बाहेर काढताना येणाऱ्या एका वळणावर सर्वाधिक आणि मोठे खड्डे पडले असून चारचाकी गाडीसुद्धा अतिशय सावकाश चालवावी लागते. पावसाचे पाणी साठते तेव्हा कुठे खड्डे आहेत हे लक्षात न आल्याने त्याचा त्रास सर्वाधिक दुचाकीस्वारांना होतो. वाहन चालवताना अचानक खड्ड्यातून गाडी गेल्याने पाठीच्या मणक्यांचा त्रास सुरू झाल्याचे विभाग कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी

या इमारतीत मनपा कोपरखैरणे विभाग कार्यालय, एक बँक, सिडको कार्यालय आणि एम टी एन एल अशी कार्यालये असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. अशात खड्ड्यांतून वाहन गेल्याने अचानक उडणारे पाणी पादचारी व्यक्तीच्या अंगावर गेल्याने वादाचे प्रसंगसुद्धा नित्याचेच झाले आहेत. इमारतीच्या वाहनतळामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने थोडा पाऊस पडला तर तळे साचते. खड्ड्यांची दुरुस्ती लवकर सुरू केली जाईल, खड्डे भरून घेण्याचे काम केले जाणार असून पाण्याचा निचरा कसा सहज होईल याची सोय केली जाईल, अशी माहिती विभाग कार्यालयामार्फत देण्यात आली.

हेही वाचा : नवी मुंबई: उद्याने, पदपथ, निवारा शेडमधील लोखंडी आसने चोरीला, गजबजलेल्या वाशीतील घटनेमुळे सीसीटीव्ही यंत्रणेबाबत साशंकता

खर्च कुणी करायचा यावरून खड्डे दुरुस्ती प्रलंबित

या इमारत आवारात सुशोभीकरण आणि खड्डे बुजवणेबाबत एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र तत्कालीन आयुक्त यांनी या इमारतीत सिडको, एम.टी.एन.एल तसेच एक बँक व कोपरखैरणे विभाग कार्यालय या सर्व आस्थापना आहेत. मात्र खर्च फक्त विभाग कार्यालयानेच का करायचा? सामायिक जागेचा वापर सर्व करतात तर खर्च सर्वांनी वाटून घ्यावा अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे इतर आस्थापनांना तसे कळवण्यात आले. मात्र अनेक वर्षे कोणीही प्रतिसाद देत नसल्याने आवाराची दुरवस्था झाली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.