नवी मुंबई : रविवारी रात्री नेरुळ येथे अनधिकृत फेरीवाल्यांच्या आपसातील भांडणात हकनाक एका रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या झाल्या नंतरही मनपाला जाग आली नाही. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेत पूर्ण नेरुळ मध्ये पहाटे तीन पर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. यावेळी काही अधिकाराच्या सीमा असल्याने पोलिसांनी मदतीला पालिकेला सोबत घेतले होते.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा कर्मचारी सुरक्षा कारणास्तव पोलिसांची मदत घेतात. मात्र नेरुळ मध्ये पहाटे तीन पर्यंत पार पाडलेल्या कारवाईत पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यासाठी मनपाला सोबत घेतले होते. अनधिकृत फेरीवाल्यांवर थेट कारवाई करण्यातही पोलिसांना अधिकाराच्या सीमा येत असलयाने मनपाला सोबत घ्यावे लागले हे उघड सत्य आहे. यासाठी काही दिवस अगोदर पोलिसांनी नेरुळ विभाग कार्यालयास पत्र हि दिले होते.
हेही वाचा… रेवस जेट्टी रखडल्याने करंजा-रेवस रो रो सेवेची प्रवाशांना प्रतीक्षाच
रविवारी अनधिकृत फेरीवाल्यांच्या वादातून एका रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या झाली. या पूर्वीही नेरुळ परिसरात दुकानासमोर अनधिकृत बसणारे फेरीवाले आणि दुकानदार, फेरीवाले आणि अतिक्रमण विरोधी पथक तसेच फेरीवाल्यांचे अंतर्गत वाद भांडणे हाणामाऱ्या हल्ले अशा घटना घडल्या तर आता त्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी पहाटे तीन पर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्या. पोलीस थेट कारवाई करणे शक्य नसल्याने त्यांनी यासाठी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाला समवेत घेत कारवाई केली. यात नेरुळ स्टेशन पूर्व आणि पश्चिम, शिरवने गाव , जुईनगरचा भाग, डॉ. डी वाय पाटील रुग्णालय परिसर, एल पी चौक, शिरवणे एमआयडीसीचा शीव पनवेल मार्गाला समांतर रास्ता, बिराजदार चौक, दारावे आणि करावे गाव, अशा सर्व ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन प्रमाणे कारवाई केली. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कारवाई मनपा करीत असेल तरी सूत्र पोलिसांनी हातात घेतल्याने अशा कारवाईत अगोदरच पळून जाणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचे फावले नाही. या कारवाईत सातत्य रहावे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
हेही वाचा… ११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात सुधागड उजळून निघाली
तानाजी भगत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरुळ) रात्री फेरीवाले मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्यावर कारवाई संदर्भात नेरुळ विभाग कार्यालयास सोबत घेत सदर कारवाई करण्यात आली आहे. आता ठराविक दिवसांनी कारवाई करण्यात येईल. सदरच्या कारवाईत नेरूळ पोलीस ठाणे कडील २ अधिकारी १५ पोलीस अंमलदार यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग कार्यालयाचे विभाग आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नेरुळ येथे डॉ. डी वाय पाटील रुग्णालय परिसरात एक शहाळे विकणारी महिलेचे व याच परिसरातील अंडा भुर्जी विकणाऱ्या एका अनधिकृत फेरवाळ्यात जागेवरून वाद होता. या वादातून अंडाभुर्जी वाला रात्री शहाळे चोरी करत होता. याची चित्रफीत येथेच नेहमी पार्क असणाऱ्या रुग्णवाहिकेतून युवराज अंजमेंद्र सिह या चालकाने बनवली आणि ती शहाळे विकणाऱ्या महिलेस दाखवली. याचाच राग मनात धरून अंडा भुर्जी वाल्यांनी युवराज अंजमेंद्र सिह याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी चार आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यात वडील आणि त्याच्या तीन मुलांचा समावेश आहे . तिघांना अटक केले तर सर्वात लहान मुलगा अल्पवयिन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.