नवी मुंबई : इन्स्टाग्राम आयडी फॉलो करून भरघोस पैसे मिळवा असे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची तब्बल २८ लाख ९० हजार ४०२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. मकरंद गुंडरे असे यातील फिर्यादी यांचे नाव आहे. त्यांना २९ ऑक्टोबर रोजी एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना इन्स्ट्राग्रामवर फॉलो लाईक करा, प्रत्येक दोन लाईक किंवा फॉलोला २१० रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. सुरूवातीला मकरंद यांनी दोन फॉलो करताच त्यांना ४२० रुपये आले. तसेच त्यानंतरही केल्यावर पटापट पैसे मिळाले.
हेही वाचा : वडील रिक्षाचालक, आई गजरे विकते; मुलाने परदेशात मिळवली पीएचडी, उरणच्या सागर अडतरावची यशोगाथा
काही दिवसांनी फोन वरील व्यक्तीने प्रीपेड योजना सांगितली त्यानुसार २ हजार रुपये भरल्यावर टास्क पूर्ण होताच २ हजार ८०० रुपये मिळतील असे आमिष दाखवले म्हणून मकरंद यांनी फोन वरील व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर २ हजार रुपये भरले. अशाच प्रकारे अनेकदा पैसे भरण्यास सांगून पैशांचा परतावा आणि फॉलो करण्याचे पैसेही देण्यात आले. दरम्यान त्यांना पैसे विविध बँक खात्यावर भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र परतावा मिळत असल्याने मकरंद हे पैसे भरत गेले. एक वेळेस तर २६ हजार ८०० रुपये त्यांना मिळाले. नंतर एक लिंक पाठवून त्याद्वारे रक्कम भरण्यास सांगण्यात आले. मात्र नंतर परतावा मिळाला नाही. वारंवार मागणी केल्यानंतर संपर्क तोडण्यात आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे मकरंद यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.