नवी मुंबई : माथाडी कामगारांनी १ फेब्रुवारी रोजी शासन दरबारी कामगारांच्या असलेल्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. यादरम्यान मुख्यमंत्री यांनी अधिकारी, उपमुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले जातील,असे आश्वासन दिले होते. पुढील आठवड्यात अधिवेशन सुरू होणार असून, अद्याप एकही बैठक घेण्यात आली नसल्याने माथाडी नेते आणि कामगार शासनाच्या संयुक्त बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच शासनाला बैठक घेण्यासाठी मुहूर्त कधी सापडेल? असा प्रश्न माथाडी नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
माथाडी कामगार कायदा टिकवण्यासाठी संयुक्तपणे बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माथाडी बोर्डात माथाडीच्या मुलांना प्राधान्य, माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये माचाही सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, पुनर्रचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना, माथाडी कामगारांना घरे, तसेच बोगस माथाडी कामगार टोळ्यांना आळा घालून कायदेशीर कारवाई करणे, या प्रलंबित समस्यांची पूर्तता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्तिकरित्या बैठक घेऊन करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लाक्षणिक संपादरम्यान माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शासनाला २७ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत बैठका लावल्या नाहीत, तर मोठा लढा उभारू, असा इशारा दिला आहे. परंतु, अधिवेशन आता एक आठवड्यावर येऊन ठेपले असून, अद्याप एकही बैठक न लागल्याने मुख्यमंत्र्यांना मुहूर्त कधी सापडेल? असा प्रश्न माथाडी कामगार आणि नेत्यांमधून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा – माजी नगरसेवक मनोहर मढवी यांच्या तडीपार आदेशाला स्थगिती
हेही वाचा – सिडकोच्या शौचालयाचा केला ‘सैराट बार’, मनसेने शौचालयात धडक देत सर्विस बारचा केला भांडाफोड
आज मंगळवारी कॅबिनेट मीटिंग होती, मात्र ती रद्द झाली आहे. उद्या मीटिंग असून, उद्याच संयुक्त बैठक होईल, अशी अपेक्षा आहे. आद्यपपर्यंत एकही बैठक लागलेली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मला विश्वास आहे की, २७ फेब्रुवारीआधी बैठक घेण्यात येईल, असे माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले.