नवी मुंबई: मराठीतून पाट्या न लावणाऱ्या मॉल विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनपाने दिलेल्या नोटिसची मुदत संपूनही मराठी पाट्या न लावणाऱ्या सी उड येथील मॉल आणि आतील दुकानदारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेवटी मॉल प्रशासनाने दोन दिवसांची मुदत मागून घेतली.
शासन नियमाप्रमाणे विविध खाजगी अस्थापनांना मराठी पाट्या लावणे अनिवार्य आहे. मात्र तरीही मराठी भाषेतून पाट्या न लावणाऱ्या अस्थापनांना नवी मुंबई मनपाने नोटीस बजावल्या होत्या. तसेच २७ नोव्हेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या लावण्याची मुदत दिली होती. तरीही अनेकांनी या नोटीसला केराची टोपली दाखवली. मुदत संपूनही मराठीतून पाट्या न लिहिणाऱ्या नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल, सीवड्स या आस्थापनेवरील तसेच आस्थापनामधील दुकानांची पाटी मराठीत करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज (मंगळवारी) जोरदार आंदोलन करण्यात आले. मॉलमध्ये प्रचंड घोषणाबाजी केल्यानंतर मॉल आणि त्यातील दुकानदारांनी नमते घेत दोन दिवसांची मुदत मागवून घेतल्यावर वातावरण शांत झाले.
दुसरीकडे नेरुळ विभाग कार्यालयातही मनसेने घोषणाबाजी करीत मराठीतून पाट्या न लावणाऱ्यांवर आता नोटीस नव्हे तर थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती शहर सचिव सचिन कदम यांनी दिली. याबाबत मॉल प्रशासन आणि आतील आस्थापना धारकांनी बोलण्यास नकार दिल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.