नवी मुंबई : नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात यावर्षी जून महिना कोरडा गेला तर जुलै महिन्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. रविवारी मध्यरात्री १.३० वाजता मोरबे धरणाचे दरवाजे उघडले असून धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची शुभवार्ता असून नवी मुंबईकरांची जलचिंता मिटली आहे. पालिकेने मोरबे धरण काही दिवसातच भरेल यासाठी धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्याची चाचपणीही घेतली होती. परंतू संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोरबे धरण भरणार का? असा प्रश्न मिर्माण झाला होता.
परंतू सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. काल एका दवसात १३२ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडल्याने मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. यंदा पावसाळ्यात मोरबे धरणात आतापर्यंत एकूण ३५४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाणी उपश्यामुळे व पाऊसच न पडल्याने पाणीपातळी खाली गेली होती. परंतू मागील काही दिवसांपासून माथेरान परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. माथेरान परिसरात आतापर्यंत ५ हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
हेही वाचा : मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडे ते रोडपाली वाहतूक कोंडी
पावसाने मागील काही दिवसात चांगले पुनरागमन केले असल्याने धरण भरण्याची शक्यता वाढली होती. दररोज शहराला पाणीपुरवठ्यासाठी ४७० दशलक्षलीटर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे सातत्याने पुढील काही दिवस पाऊस पडणे आवश्यक होते. गणपतीचे आगमन झाल्यापासून सलग पाऊस पडत असल्याने अखेर धरण १०० टक्के भरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात माथेरानच्या डोंगररांगामध्ये काही दिवसातच ५००० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत ३५४९ मिमी पाऊस पडला आहे. नवी मुंबई मोरबे धरण परिसरात जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: चार दिवसाची नकोशी बॅगेत आढळली, आरोपी सीसीटीव्हीत कैद
ऑगस्ट कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने मोरबे धरण भरण्याची आशा निर्माण झाली आहे. धरण ८८ मीटरला १०० टक्के भरते. सध्या धरणाने ८८ मीटर पातळी गाठल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरले असले तरी पालिका राज्यातील दुष्काळाचे संकट पाहता पालिका सावधगिरीने निर्णय घेत आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी धरण भरल्याबद्दल लोकसत्ताशी बोलताना आनंद व्यक्त केला असून गणेशोत्सव काळात धरण भरल्याने गणपती बाप्पा नवी मुंबईकरांना पावल्याची भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा : पनवेल: मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या संचालकांवर मॉर्निंग वॉक करताना जीवघेणा हल्ला
‘मोरबे धरण १०० टक्के भरले असून ही नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता आहे. पालिका राज्यातील पावसाची स्थिती पाहता खबरदारी बाळगत असून नवी मुंबईकरांची तात्पुरती पाणीचिंता मिटली असली तरी शहरातील १० टक्के पाणीकपात मात्र सुरुच राहणार आहे’, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी म्हटले आहे.
मोरबे धरण १०० टक्के भरले…
मोरबे धरणात झालेला आजचा पाऊस- १३२.८० मिमी
धरणक्षेत्रात झालेला एकूण पाऊस- ३५४९ मिमी.
धरण पातळी- ८८ मीटर
एकूण पाणीसाठा- १९०.८९० एमसीएम ( १०० टक्के)
कधीपर्यंत पाणीपुरवठा करता येणार- ३३४ दिवस
पुढील वर्षी कोणत्या तारखेपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येणार – २४ ऑगस्ट २०२४