नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ८ येथे एन.एम.एम.टी च्या बस आगीत भस्मसात झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी नेरुळ येथेही असाच प्रकार घडणार होता. मात्र बस चालकाचे प्रसंगावधान आणि वेळीच वाहतूक पोलीस मदतीस धावून आल्याने केवळ टायर वर निभावले. एम एच ४३ बी एक्स ०३९१ ही बस जुईनगर ते जेएनपीटी ( मार्ग क्रमांक ३४)अशी जात असताना संध्याकाळी आठच्या सुमारास नेरुळ उड्डाणपूल खालील सिग्नल वर आल्यानंतर गाडीच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकातून अचानक धूर येऊन पेटल्याचे दिसले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तात्काळ बस चालक किरण फणसे यांनी गाडी थांबवली. सुदैवाने त्या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस मदतीस धावून आले आणि त्यांच्या सूचनेनुसार प्रवाशांना उतरवण्यात आले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीतील अग्निशमन सिलेंडरच्या साह्याने सदर गाडीच्या चाकाला लागलेली आग वेळीच विझवली. तसेच बस चालक फणसे यांनी पण त्यांच्याकडे असलेल्या अग्निशमन सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यानंतर सदरची गाडी ही बाजूला घेतली व अग्निशमन दलास कळवण्यात आले. ते आल्यावर पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : हार्बर मार्गावर लोकल वाहतूक १५ मिनिटे उशिरा तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांची पनवेल गाडी रद्द

या कार्यात तुर्भे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे तसेच पोलीस हवालदार पोळ, पोलीस हवालदार भोसले, पोलीस हवालदार घोरपडे, पोलीस काचगुंडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली. याबाबत एन.एम.एम.टी प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.