नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सर्वात सुव्यवस्थित विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक उद्याने, निवारा शेड, पदपथ या ठिकाणी पालिकेने बसवलेली लोखंडी बैठकव्यवस्था उखडून चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. पोलीस विभाग व नवी मुंबई महापालिका यांची व्यवस्था फक्त नावापुरती उरली की काय असा संताप नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या सौंदर्यात व देखणेपणात व स्वच्छतेत भर घालण्याचे काम शहरातील नागरिकांसाठी असलेल्या २०० उद्यानांचा मोठा वाटा आहे. नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण तसेच चालणे, व्यायाम करणे यासाठी शहरातील सर्वच उद्यानांत दिवस-रात्र गर्दी असते. वाशी सेक्टर ४ कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान, सेक्टर ७ येथील आई बाबा उद्यान, सेक्टर ४ येथील निवारा शेड, वाशी सेक्टर १ ते ६ या विभागांतील ट्री बेल्ट यांसह वाशीमधील विविध उद्यानांत व पदपथ, मोकळ्या जागा या ठिकाणी नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. याच उद्यानांत पालिकेने नागरिकांना बसण्यासाठी तयार केलेली बाके, आसनव्यवस्था चक्क पळवून नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग व पोलीस व्यवस्था करते तरी काय असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

हेही वाचा : ‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

करोडो रुपये खर्च करून पालिकेने शहरात जवळजवळ २०० देखणी उद्याने निर्माण केली आहेत. विशेष म्हणजे वाशी पोलीस ठाणे असलेल्या परिसरातच पालिकेच्या उद्यानातील पदपथांवरील तसेच मोकळ्या जागांमधील लोखंडी बाके चक्क उखडून चोरून नेली आहेत. नवी मुंबई महापालिकेने शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले आहेत ते फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत का असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

वाशी विभाग हा नेहमी गजबजलेला विभाग आहे. चोरटे चक्क पदपथावरील, निवारा शेडमधील बेंच उखडून घेऊन जातात त्यामुळे पालिका करते काय असा प्रश्न आहे. पालिकेचे सीसीटीव्ही फक्त बिले अदा करण्यासाठीच लावले आहेत का?

वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

नवी मुंबई महापालिका उद्यानात बसवलेली वाशी विभागात व इतर ठिकाणची बाके चोरी केले जात आहेत. त्याबाबत पोलिसांकडेही तक्रार केली आहे. याबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येईल. नव्याने नियुक्त केलेल्या ठेकेदारांना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देण्यात येईल.

दिलीप नेरकर, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग

हेही वाचा :नवी मुंबई: डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिले उड्डाण ‘सुखोई’चे, तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या

पालिका उद्यानात लावलेले लोखंडी आसनव्यवस्था चोरी करून घेऊन जात असतील तर उद्या रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचे काय? या विभागात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात असून सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात, उद्यानात पालिकेने लावलेले सीसीटीव्ही काय कामाचे, पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

अमोल देवकर, स्थानिक रहिवासी, वाशी सेक्टर ४
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai municipal corporation s iron benches stolen from the municipal gardens at vashi css