नवी मुंबई : दुचाकी चोरी करण्यासाठी मित्रांचाच वापर अत्यंत कल्पकतेने करणाऱ्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने केलेल्या अन्य चार गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. आरोपी स्वतः डिलेव्हरी बॉयचे काम करीत असून त्यासाठी वापरात असलेली दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात समोर आले आहे.
कुणाल सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ सप्टेंबरला नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतून एक दुचाकी चोरी झाली होती. या दुचाकी चोरीचा तपास करत असताना तांत्रिक तपास आणि परंपरा खबरी कडून मिळालेली माहिती तसेच काही ठिकाणच्या सीसीटीव्हींची पाहणी केली असता सोनवणे त्यात आढळून आला. मात्र त्यावेळी आरोपीचे नाव व अन्य कुठलीच माहिती समोर आली नव्हती. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे व अन्य गस्त पथकाला सोनवणे नेरुळ स्टेशन परिसरात आढळून आला.
हेही वाचा : वय वर्ष केवळ १९ आणि ९ गुन्हे! आरोपी जेरबंद, पैशांचे आमिष दाखवून करत होता फसवणूक
त्याच्या संशयास्पद हालचाली आणि दुचाकी चोरी प्रकरणी सीसीटीव्हीतील व्यक्ती एकच असल्याची शंका आल्याने त्यांनी सोनावणे याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तेथे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केलाच शिवाय अन्य तीन दुचाकी अशा एकूण चार दुचाकी चोरी आणि एक बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. त्याच्या कडील दुचाकी तो डिलेव्हरी कामासाठी वापरत होता. सदर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.
हेही वाचा : नामांकित कंपन्यांच्या नावाने खाद्य तेलात भेसळ करणारी टोळी उध्वस्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हा करण्याची पद्धत : आरोपी हा जी गाडी चोरी करायची आहे ती गाडी अगोदर हेरून ठेवत असे. दुचाकीचा मालक गाडी पार्क करून गेल्यावर येण्यास उशीर होणार असल्याची खात्री करून घेत असे. यासाठी तो रेकी करत होता. अशी दुचाकी हेरली कि आपल्याच एखाद्या मित्राला सदर गाडी कुठे पार्क केली, क्रमांक काय, रंग कोणता, हि माहिती देत होता. मी बाहेर गावी आहे, किल्ली हरवली आहे, कृपया किल्ली बनवणाऱ्याला घेऊन जावे आणि किल्ली बनवून गाडी घरी आणावी, अशी आर्जवी विनंती करीत होता. अशाच प्रकारे तीन दुचाकी चोरी त्याने केल्याची कबुली दिली.