नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी तब्बल साडेतीनशे पोलिसांचा फौजफाटा घेत उलवा नोडमध्ये कोंबिंग ऑपरेशन केले. एकाच वेळी १२ ठिकाणी छापे टाकले. यात नायझेरियन १५ नागरिकांवर पारपत्र कलमान्वये कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेले नायझेरियन नागरिक बहुतांश वेळा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हा अनुभव नवी मुंबई पोलिसांच्याही पाठीशी आहे. असे असतानाही उलवा येथील कारवाई दरम्यान पोलिसांची बेफिकरी नडली. झाला प्रकार असा की एका इमारतीतून पोलिसांच्या गराड्यात बाहेर आणलेला नायझेरियन अचानक सुसाट पळत सुटला. त्याला पकडण्यास त्याच्या मागे धावणारा एक पोलीस कर्मचारी पळताना पडला.
हेही वाचा : कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर वाढतोय बकालपणा
हा प्रकार घडताच सर्वच पोलीस कारभारी त्याला पकडण्यास धावले. काहींनी चपळता दाखवत तो पळून गेलेल्या दिशेला लवकर पोहचणारा एका इमारतीतून दुसऱ्या इमारतील जाणाऱ्या मार्गाचा अवलंब केला. शिवाय एका पोलीस कर्मचाऱ्याने तात्काळ दुचाकी गाडीला किक मारत त्याचा पाठलाग सुरू केला. या चपळतेचे फळ पोलिसांना मिळाले व काही अंतरावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नायझेरियन नागरिक पळून गेला त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनीही त्याला पकडल्याचा व्हिडीओ पत्रकारांना पुरवला. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनीही “जाऊ द्या हो शेवट चांगला म्हणजे सर्व काही चांगले”, अशी मिश्किल टिपण्णी केली.