नवी मुंबई : एनएमएमटीने बस थांब्यावर लावलेले डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे बस संबंधित बस थांब्यांवर नेमके कधी येईल हे प्रवाशांना कळत नाही. असा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे जोशात सुरू करण्यात आलेला चांगल्या उपक्रमात सातत्य राखण्यातील दुर्लक्षामुळे अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे. एनएमएमटी प्रशासनाने २०१८ मध्ये आयटीएमएस या प्रणालीद्वारा शहरातील १०० बस थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे त्या बस थांब्यांवरून जाणाऱ्या सर्व एनएमएमटी बस कुठल्या मार्ग क्रमांकाची आणि किती वाजेपर्यंत येईल हे सहज समजत होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होत होता.
विशेष म्हणजे एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते. याच कारणाने प्रवासी संख्याही वाढत होती. दोन-अडीच वर्षे हा उपक्रम व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर हळूहळू करीत एक-एक डिजिटल फलक बंद पडत गेले. याबाबत २०२२ डिसेंबरमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त आल्यावर त्याची दखल घेत एनएमएमटी प्रशासनाने ते पुन्हा सुरू केले. मात्र गेल्या काही आठवड्यापांसून अनेक बस थांब्यांवरील डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत.
हेही वाचा : बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
२०१८ मध्ये ९ कोटींचा खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र २०२२-२३ मध्ये हे फलक बंद पडले त्यावेळी नव्याने घेतलेल्या बसगाड्यांमध्ये फोर जी स्पेक्ट्रम प्रणाली होती आणि डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही टू जी स्पेक्ट्रमची होती. त्यामुळे फोरजी प्रणाली टूजी प्रणालीला सहाय्यकारी ठरत नव्हती. मात्र त्यात तांत्रिक दुरुस्ती वा अद्यायावत केले जात नव्हते. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर प्रणाली अद्यायावत करण्यात आली. मात्र आता पुन्हा हे फलक बंद पडले आहेत. याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने आता काही सांगू शकत नाही, असे सांगण्यात आले. तर व्यवस्थापक याच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.