नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थनाकाबाहेरील परिसरात दिवसेंदिवस बकालपणा वाढत चालला आहे. बेघरांचे बस्तान रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागेवर वसले आहे. फूटपाथवर राहणारे बेघर नागरिक त्याच ठिकाणी आपला संसार थाटून बसलेले आहेत. यांच्याकडून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरविण्यात येत आहे. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिका शहरात विशेषतः रेल्वे लगतच्या भिंतींना रंगरांगोटी करतेय, मात्र सिडको आणि महापालिकेचे परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या सिडकोच्या भूखंडावर तसेच पदपथावर अनधिकृत झोपड्यांचा विळखा वाढला होता. या अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर मोठ्या पोलीस फौजफाट्यासहित तोडक कारवाई करण्यात आली. मात्र आता त्या कारवाई केलेल्या बेघरांनी रेल्वे स्थानकाबाहेर आपला तळ ठोकला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून याठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळी जागा आणि सेवा रस्ता याठिकाणी सिडकोने बाबूं बांधून ‘पे अँड पार्क’ सुरू केले आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत
रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जी जागा उपलब्ध होती त्यावरच या बेघरांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास तर सहन करावा लागतच आहे. शिवाय हे झोपडपट्टी धारक त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने त्याच ठिकाणी अंघोळ,कपडे भांडी ही धुतली जात आहेत. त्यामुळे हा रेल्वे स्थानक परिसर आहे की झोपडपट्टी अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याकडे आद्यप सिडको तसेच महापालिकेने कोणतीही कारवाईची तत्परता दाखविली नाही. हा परिसर स्वच्छ कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.