नवी मुंबई : नवी मुंबईतील फादर ऍग्नेल शाळेतील तरण तलावात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणी अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शवविच्छेदन अहवाल आला नाही, पोलिसांनी दखल घेत काहीही कारवाई केली नाही आणि धक्कादायक बाब म्हणून शाळा प्रशासन पालकांचे सांत्वन करणे दूरच साधी भेटही देत नाही. शेवटी या विरोधात पालकांनी मोर्चा काढण्यात आला तरीही शाळा प्रशासनाला पाझर फुटला नाही . 

१३ एप्रिल रोजी फादर फादर ऍग्नेल शाळेच्या तरण तलावात  मयूर डमाळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मयूर हा याच कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी होता. या घटनेवेळी चार पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक उपस्थित असताना झालेल्या या प्रकाराने केवळ मयूर याचे पालक नव्हे तर तरण तलावात ज्यांचे पाल्य पोहण्याचे प्रशिक्षण घेतात त्या सर्व पालक वर्गाला धक्का बसला होता. पोहताना काही अपघात होऊ नये म्हणून एवढी सुरक्षा यंत्रणा असताना  मयूर याचा  मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले. त्यात एखाद्या पालकांचा पाल्य आपल्या तरण तलावात बुडून मृत्युमुखी होतो तरीही शाळा प्रशासनाने त्या पाल्यास भेट नाकारली. त्यामुळे संशयाला बळकटी मिळते असा आरोप अनेक पालकांनी केला.  शाळेच्या या उद्दाम बेजवाबदार आणि अमानवीय कृती विरोधात आम्हाला मोर्चाचे काढावा लागला असा आरोप एका पालकाने केला. 

हेही वाचा : नवी मुंबई: एपीएमसीतील नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात बाजारात साचले पाणी

मयूरचा मृत्यू  अनैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा करण्यात आला तसेच संदर्भात त्याच्या पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल चर्चा करण्याकरिता फादर अ‍ॅग्नेल शाळेच्या प्रशासनाने त्यांना वेळ द्यावा ही विनंती करणारे पत्र  पालकांच्या वतीने शाळेच्या प्रशासनाला दिले होते. परंतु त्याची दखल शाळेने  घेतली नाही.त्यामुळे मयूरच्या पालकांच्या समर्थनार्थ नेरूळ येथील  रहिवासी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व महिला परिषद कार्यकर्ता मोर्चात सहभागी होत मोर्चा काढणयात आला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे पालक वर्गातील संताप आहे. असा दावा पालकांनी केला. मोर्चा येणार आहे हे माहिती असूनही शाळा प्रशासकांनी शाळेला दांडी मारली आणि मंगळवारी भेट घेऊ असे सांगत वेळ मारून नेली अशी माहिती मोर्चातील एका पालकाने दिली. त्यानंतर हे आंदोलक  वाशी पोलीस ठाण्यात गेले त्याही ठिकाणी मंगळवार पर्यंत तपास करून आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन देण्यात आले. येत्या ५ दिवसात आरोपीना अटक करुन खटला हा जलद गतीने व्हावा असे सांगण्यात आले . अन्यथा  नवी मुंबई पोलिस आयुक्त ह्यांच्याशी हा विषय मांडू व आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असे पालकानी सांगितले.

हेही वाचा : नवी मुंबई: एपीएमसीतील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत

या प्रकरणी पोलिसांना विचारणा केली असता तपास सुरु आहे असे सांगण्यात आले तर संबंधित शाळा प्रशासन प्रतिनिधींशी प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

मयूरच्या मृत्यू प्रकरणी पालकांचे आक्षेप 

मयूरचा मृत्यू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत त्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही.(जो सुरवातीला देण्यात आला त्यात मृत्यूचे कारण स्पष्ट न करता पेंडिंग असे नमूद आहे.)

फादर अ‍ॅग्नल सारख्या नामांकित शाळेने त्यांच्या विद्यार्थ्याचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला असूनही त्याच्या पालकांना साधी भेटही का दिली नाही?

तरण तलावातून बेशुद्ध अवस्थेत/ मृत अवस्थेत त्याला बाहेर काढल्यावर महानगरपालिकेच्या इस्पितळात न नेता मयूरला खासगी इस्पितळात का नेले ?

महिला संघटनेने या घटनेत लक्ष घालून पालकांच्या भेटी करता लेखी पत्राद्वारे वेळ मागितली असता त्या पत्राचे लेखी उत्तर देणे दूरच मात्र भेट का नाकारली .

हेही वाचा : पनवेलमध्ये सकाळपासून जोरधारा

अत्यंत हुशार ध्येयवादी मुलाचे अशा प्रकारे जाणे अत्यंत वाईट आहे. मात्र शाळेने आपली जवाबदारी झटकणे प्रचंड संतापजनक आहे. मयूरच्या मृत्यू अपघाती असेल तर भेट न देणे, शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त न होणे, सुरक्षा रक्षक असताना झाले त्यांच्यावर काय कारवाई असे अनेक अनुत्तरित प्रश्नांना शाळा प्रशासन उत्तर का देत नाही. अडीच महिने झाले तरी मागणी करूनही प्रत्यक्ष भेट देत नाहीत. त्यामुळेच संशय बळावत चालला आहे. 

दीपाली ढमाले (मयत मयूरची आई)