नवी मुंबई – शहरात झाडावर विद्यूत रोषणाई केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून वारंवार आाहन केले जात असतानाही झाडांवर खिळे ठोकून जाहिराती तसेच विद्यूत रोषणाई करण्याचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत झाडांना तसेच पर्यावरणाला हानी पोहोचवू नये असे आवाहन वारंवार केले जाते. त्यासह वृक्ष प्राधिकरणाने २७ जानेवारी २०२५ रोजी एक ठराव पारित केला असून, त्यानुसार वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे किंवा वृक्षांना इजा पोहोचवणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिकांवर १०,००० रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, आवाहनानंतर आणि दंड आकारणीचे माहिती असतानाही अनेकजण झाडांवर जाहिरात फलक आणि विद्यूत रोषणाई करत असल्याचे पाहायला मिळतात.

नुकतेच नवी मुंबई महापालिकेने बेलापूर सेक्टर ३ येथील एका बड्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेल मालकाने हॉटेल बाहेरील झाडावर विद्यूत रोषणाई केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर बेलापूर विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आणि हॉटेल मालकाकडून १०,००० रुपये दंड वसूल केला. ही कारवाई बेलापूर विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या नेतृत्वात आणि उद्यान विभाग परिमंडळ १ चे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन

आगामी काळात सर्व विभागीय कार्यक्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे आणि इतर पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कृत्य टाळण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि संस्थांनी अशी कृत्ये करु नयेत, अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नवीमुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने सांगितले आहे.

प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई

तसेच, परिमंडळ २ मधील प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करताना ऐरोली येथील सेक्टर ८ जवळील एका दुकानातून प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले. याठिकाणी १०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांची जप्ती करण्यात आली आणि ५,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.