नवी मुंबई : दिवाळी तोंडावर असताना नवी मुंबईतील काही उपनगरांमधील रहिवाशांना पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. नेरुळ, सारसोळे भागांत पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने संतापलेल्या येथील लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सोबत घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरण १०० टक्के भरले आहे. असे असताना शहरातील काही भागात पुरेशा दाबाने तसेच वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. नेरुळ सेक्टर सहा तसेच कुकशेत, सारसोळे परिसरांत अजूनही पाण्याचा नियमित पाणी देण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आलेले नाही. या प्रश्नावर गुरुवारी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी दिला. या प्रश्नावर इतर लोकप्रतिनिधींनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक

“नवी मुंबई शहरात सर्वच विभागांत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याबाबत कोठेच तक्रार नाही. नेरुळ व सारसोळे या विभागांतही पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्या नाहीत. याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल.” – अरविंद शदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Story img Loader