नवी मुंबई : मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईतही दररोज धुरके आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र कायम असून या वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, पडसे तसेच खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत वाशी आणि कोपरखैरणेच्या वेशीवर असलेल्या कोपरी भागातील प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. वाशी, कोपरखैरणे तसेच पाम बीच मार्गावरील मोराज परिसरात राहणारे रहिवासी सायंकाळपासून मुंबईकडून वाऱ्याने वाहत येणाऱ्या उग्र दर्पाने हैराण झाले असून याविषयी स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
वाढत्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या कोपरी येथील नागरिकांनी नवी मुंबई विकास अधिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून कोपरी सेक्टर २६ येथील चिंतामणी चौकात एक तासाचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या आसपासच्या भागातील रहिवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महापालिकेचे अधिकारी अजूनही या नागरिकांची तक्रारींची दखल घेण्यासाठी फिरकलेले नाहीत.
हेही वाचा : उरणमध्ये अवेळी पावसाचा भात पिकाला फटका; शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांना खेटून असलेला हा परिसर नवी मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित मानला जातो. याच भागातून खाडीच्या दिशेने सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यातून सकाळ-सायंकाळी उग्र दर्प सुटत असून त्याकडेही यंत्रणांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या नाल्यामुळे खाडीत प्रदूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी असून सकाळी वाशीतील मिनी सीशोअर तसेच कोपरखैरणे भागात खाडी किनारी फेरफटका मारावयास येणाऱ्या रहिवाशांचा कोंडमारा होऊ लागला आहे.
प्रदूषण वाढतेच
नवी मुंबई महापालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेल्या हवेतील गुणवत्तेच्या मोजणीत कोपरी येथील हवेचा निर्देशांक २५० ते २९० च्या घरात असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण धोकादायक आहे. महापे, सानपाडा येथील हवेचा निर्देशांकही २०० पेक्षा अधिक असून हवेच्या गुणवत्तेची पातळी सातत्याने ढासळत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते संदीप ढोबळ यांनी दिली. सानपाडा, नेरुळ, महापे या केंद्रांवरील हवेचा निर्दशांक १७० ते २२० पर्यंत असला तरी या भागातही सकाळच्या धुरक्यामुळे सतत बदलत्या वातावरणाचा अनुभव रहिवासी घेत आहेत.
हेही वाचा : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका
“कोपरी तसेच नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील हवेची स्थिती अत्यंत वाईट व धोकादायक आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. दर रविवारी एक ते दोन तास आम्ही नागरिक एकत्र जमतो आणि धरणे आंदोलन करतो. हा लढा अधिक तीव्र केला जाणार आहे” – संकेत डोके, नवी मुंबई विकास अधिष्ठान
“शहरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत सातत्याने तपासणी केली जाते. तसेच कंपन्यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाते. या आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या शिष्टमंडळाद्वारे हवा गुणवत्ता तपासणीही केली आहे. तसेच एमआयडीसी सांडपाणी वाहून जाण्याचे पाइपलाइनचे ७० टक्के काम केले आहे. त्यामुळे हवा प्रदूषण रोखण्यासाठी नियमावलीनुसार कार्यवाही करत आहोत.” – जयंत कदम, उपप्रादेशिक विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ