नवी मुंबई : नेरुळ पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर धाड टाकून कारवाई केली असून सदर ठिकाणी शासन बंदी असलेला हुक्का सर्रास वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कारवाई शुक्रवारी अपरात्री करण्यात आली. 

नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शिरवणे गावात शानदार हुक्का पार्लर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेले तंबाखू जन्य पदार्थ वापरून हुक्का ओढला जात असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी एक बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. मिळालेली माहिती सत्य असल्याची खात्री पटताच या हुक्का पार्लरमध्ये शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास पथक पाठवून कारवाई केली.

हेही वाचा : पहिल्याच जोरदार पावसाने पुन्हा एकदा उरण रेल्वे स्थानक पाण्यात बुडाले; प्रवाशांचे हाल सुरू, रेल्वेने पंप लावून ही पाणी साचले

यावेळी पेनफुल डेथ नावाची सुगंधित तंबाखूचा डबा, आणि दोन हुक्का पॉट आढळून आले. हे सर्व सुमारे साडे तीन हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी व्यवस्थापक माजोज शर्मा, कामगार जिशान पठाण,अजय गणपते यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.