नवी मुंबई : नवी मुंबई हे नियोजित शहर असले तरी बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते चिंचोळे बनले असून वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. याबाबतची उपाययोजना करण्यासाठी रस्त्यावर वाहन दुरुस्ती करणाऱ्या बेकायदा गॅरेजवर कारवाई केली आहे. नेरुळ पोलिसांनी दोन दिवसात चार गुन्हे दाखल केले आहेत.
नवी मुंबईत अनेक ठिकाणी व्यावसायिक गाळ्यात गॅरेज सुरु करून गाड्या थेट रस्त्यावर पार्क करून दुरुस्ती वा गाडीचे सुशोभीकरण (डेकोरेशन) केले जाते. मात्र नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत शिरवणे येथे अगोदरच छोट्या मात्र मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यावरही असे गॅरेज असल्याने गर्दीच्या वेळी सामान्य वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गॅरेज चालक त्याच्याकडे आलेल्या गाड्या थेट रस्त्यावर पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. एखाद्याने हटकले व वारंवार हॉर्न वाजवले तरी एक तर लक्ष दिले जात नाही अथवा दादागिरी करून भांडण उकरले जाते. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालक निमूटपणे जसा रस्ता मिळेल तसे निघून जातात.
हेही वाचा : नवी मुंबई: अल्पवयीन मुलावर मॉल मधील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार; आरोपी जेरबंद
नेरुळ सेक्टर १ शिरवणे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी एक चारचाकी गाडी पार्क करून तिची दुरुस्ती केली जात होती. त्यामुळे दुरुस्ती करणारा मोहम्मद अली नसीब अली खान याच्याविरोधात शुक्रवारी दोन आणि शनिवारी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच परिसरात अशाच पद्धतीने गाडी दुरुस्त करणाऱ्या अनिरुद्ध कुमार भारद्वाज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कडक पाऊले उचलत रस्त्यावर गाड्या पार्क करून गाड्यांचे सुशोभीकरण किंवा दुरुस्ती करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा : नवी मुंबई पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ
मात्र नेरुळ पोलिसांनी दाखल केलेल्या चार गुन्ह्यातील तीन गुन्हे एकाच व्यक्तीवर आहेत. विशेष म्हणजे हे चारही गुन्हे गॅरेज मालकावर नव्हे तर गाडी दुरुस्ती करणाऱ्या कामगारावर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल केल्यावरही कायद्याचा धाक नसल्याचे चित्र निदान येथे तरी दिसत आहे.