नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाहन चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका दलालाचा समावेश आहे. अटक आरोपींकडून आतापर्यंत देशातील विविध ठिकाणाहून ५ कोटी ५० लाख २३ हजार रुपयांची २९ वाहने जप्त केली आहेत. ही सर्व वाहने अवजड प्रकारामधील आहेत. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणीपूर, नागालॅण्ड या राज्यांत नोंदणी करून व महाराष्ट्रात हस्तांतरण करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पुनर्नोंदणी करून वाहनांची विक्री केली जात होती.
वाहन चोरीबाबत तपास करत असताना गुन्हे शाखेला ए.पी.एम.सी. मध्ये येणारे अनेक ट्रक व इतर अवजड वाहने चोरीची आहेत. ही वाहने परराज्यांतून चोरी करून त्यांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केली जात होती, असे एका वाहन चोरी गुन्हे तपासात समोर आले. प्रादेशिक परिवहन विभागाच्या पोर्टलवर त्याची नोंद आढळून येत असल्याने या चोरी साखळीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सामील असल्याची शक्यता समोर आली. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे असून सातत्यपूर्ण तपास करणे आवश्यक असल्याचा समोर आले.
हेही वाचा: ठाण्याचा उमेदवार ‘डमी’ असल्याची गणेश नाईक समर्थकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय रेडडी प्रताप देसाई आणि अन्य कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले. पोलीस पथक यांनी तपास करत असताना खबरीद्वारे ही टोळी संभाजीनगर येथून कार्यरत असून त्याचा सूत्रधार आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार, किराडापुर हा असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर . छत्रपती संभाजीनगर येथून त्याला २२ मार्चला अटक करण्यात आली. सूत्रधार हाती लागल्याने गुंता उकलत गेला. जावेद अब्दुला शेख उर्फ मनियार याने देशभरातील विविध राज्यांतून चोरी करून त्याचे चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकात फेरबदल करून, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीप्रमाणे अॅल्युमिनियमच्या इंजिन नंबर प्लेट बनवून घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अमरावती उपप्रादेशिक कार्यालयातील भाग्यश्री पाटील ४२( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी), सिद्धार्थ ठोके ( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) , गणेश वरुटे ( प्रादेशिक परिवहन अधिकारी), वरुण जिभेकर आर टी ओ एजंट तसेच प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असलेले शिवाजी गिरी ,अनिल संकटासिंग , शेख दिलावर मंसुरी उर्फ मामु, मोहम्मद अस्लम शेख असे एकूण ९ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
हेही वाचा: युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल
आरोपींवर अनेक ठिकाणी गुन्हे
अटक आरोपी जावेद मनियार यांचे विरूध्द अशा प्रकारे नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर, औरंगाबाद आयुक्तालय व धुळे येथे चोरी व फसवणुकीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपी रफीक मंसुरी यांचेवर ०३ गुन्हे दाखल आहेत. आता पर्यंत एकूण ९ आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्या कडून ५ कोटी ५० लाख २३ हजार रुपयांची २९ वाहने जप्त करण्यात आले आहेत. यात वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली गेली आहे.