नवी मुंबई : गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या कोकणवासीयांची खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रवासी भाड्यात लूट होऊ नये याकरिता नवी मुंबई आरटीओने दर पत्रक जारी केले असून नवी मुंबईतील थांब्यावर जादा भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारणी करण्याचे सूचित केले आहे. निश्चित दरापेक्षाही जादा भाडे घेतल्यास कारवाई करण्यात येणार असून आरटीओकडून कालपासून खासगी बस चालकांची तपासणी देखील सुरू केली आहे, अशी माहिती आरटीओने दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.
कोकणवासीय रेल्वेने प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात,परंतु गणेशोत्सवादरम्यान एक महिना आधीच तिकीट आरक्षित करून ही प्रतिक्षा करावी लागते, त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारणी करून आर्थिक लूट केली जाते. या सर्वसामान्य प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहे.
हेही वाचा : ओएनजीसी तेल गळती नुकसान भरपाईसाठी स्थानिक आक्रमक; उरणचा भोपाळ करायचा का? असा सवाल करीत आंदोलन
त्याच अनुषंगाने नवी मुंबई आरटीओ विभागाने देखील वाशी ते कोकणात जाणाऱ्या २१ मार्गावरील बस थांब्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. प्रवासभाडे निश्चित केलेल्या २१ मार्गांमध्ये महाड, खेड, चिपळूण , रत्नागिरी, कुडाळ , राजापूर, देवगड, लांजा , सावंतवाडी मालवण यासह कणकवली, गणपतीपुळे, गगनबावडा आदींचा समावेश आहे. तसेच बस थांब्यावर दर पत्रके लावून त्याचे पालन करण्याच्याही सूचना केल्या आहेत. यादरम्यान खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : शाळकरी मुलींची छेड काढणारा गजाआड
‘गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारणी करून लूट थांबविण्यासाठी दरपत्रक निश्चित केले आहे. त्यानुसारच शुल्क घेतले जावे,त्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दोन दिवसांपासून खासगी बसची तपासणी सुरू केली असून अद्याप कोणी जादा भाडे आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले नाही’, असे वाशीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : जसखार ते करळ-सोनारीला रस्ता देण्याची मागणी, चार गावातील नागरिकांचा रेल्वे रुळावरून धोकादायक प्रवास
आरटीओने निश्चित केलेले दर
वाशी ते महाड – ४२८
वाशी ते खेड – ५७८
वाशी ते चिपळूण – ६२३
वाशी ते दापोली – ५३३
वाशी ते श्रीवर्धन – ४२८
वाशी ते संगमेश्वर – ७२८
वाशी ते लांजा – ८९३
वाशी ते राजापूर – ९५३
वाशी ते रत्नागिरी – ८४८
वाशी ते देवगड – ११८५
वाशी ते गणपतीपुळे – ९७५
वाशी ते कणकवली – १११०
हेही वाचा : वाशीतील पे अँड पार्कवरील गाळ्यांचा तिढा कधी सुटणार? वापराविना गाळ्यांची दुरवस्था
वाशी ते कुडाळ – ११८५
वाशी ते सावंतवाडी – १२६०
वाशी ते मालवण – १२१५
वाशी ते जयगड – ९५३
वाशी ते विजयदुर्ग – १२००
वाशी ते मलकापूर – ९०८
वाशी ते पाचल – ९९०
वाशी ते गगनबावडा – १११०
वाशी ते साखरपा – ८१८