उरण : समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे लाल तांदूळ(राता) या जातीचे भात पीक घेत होते. मात्र विशेष औषधी गुण असलेल्या या पिकाचे दर व मागणीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी लाल तांदूळाचे पारंपरिक पीक सोडून इतर नगदी भात पिकांकडे वळलेले शेतकरी पुन्हा एकदा या लाल तांदळाच्या पिकांकडे वळू लागले आहेत. राता जातीचे भात पीक हे अनेक प्रकारच्या औषधी गुणांनी युक्त असल्याने त्याला देशात प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र उरण मधील वाढत्या औद्योगिक व नागरिकरणामुळे हे पीक कमी झाले आहे.

हेही वाचा : उरण : करंजा-रेवस खाडी पुलाचा खर्च फुगला; ४३ वर्षांत ३०० कोटींवरून ३ हजार ४०० कोटींवर पोहोचला

उरणमध्ये या भाताचे पीक हे खाडी किनाऱ्यावरील क्षेत्रात अधिक प्रमाणावर घेतले जात होते. येथील शेतीच नष्ट झाल्याने व लाल भाकरी आणि भात हे नव्या पिढीला योग्य वाटत नसल्याने येथील नागरिकांच्या रोजच्या आहारात लाल तांदळाचे सेवन घटले आहे. मात्र अनेक संशोधनातून सध्याच्या वाढत्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती यांच्यावर उपायकारक व पोषकतत्व यांनी युक्त अँन्टीऑक्सिडंट, वजन घटविणारी पोषक तत्वे असल्याने या भाताला मागणी वाढली आहे. त्यामुळे या भाताचे दर किलोला ७५ रुपये तर पिठाचा दर ९० रुपये झाला आहे. धाकटीजुई परिसरात पहिल्यांदाच पाऊण एकरात रात्याच्या पिकाची लागवड केली असून यावर्षी चांगले उत्त्पन्न मिळेल अशी माहिती विंधणे येथील शेतकरी दत्तात्रय नवाळे यांनी दिली आहे.

Story img Loader