नवी मुंबई : गावाकडे राहणाऱ्या कुटुंबियांना पैसे पाठवण्यासाठी एका सुरक्षा रक्षकाने फोन पे डाऊनलोड करून घेतले. मात्र वापर करता येत नसल्याने पैसे पाठवण्यासाठी मित्राची मदत घेत होता. याचाच गैरफायदा घेत मित्राने आर्थिक फसवणूक केली. रामरतन अमर सिंग हे माजी सैनिक असून घनसोलीतील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचे मुळ गाव पंजाब राज्यातील सुखचैनपुर हे असून त्यांचे कुटुंबीय तेथेच राहतात. त्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये बचत करून ६ लाख रुपये जमा केले होते.
मोबाईल बँकिंगचे ज्ञान कमी असल्याने तसेच प्रत्येक महिन्याला पत्नी व मुलाला घर खर्चासाठी पैसे पाठवावे लागत असल्याने दोन वर्षांपासून सोबत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक सुखबीर सिंह याने रामरतन यांना त्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून दिले. त्याचा पासवर्ड देखील त्यानेच तयार करून दिला होता.रामरतन यांना फोन पे हे अॅप्लिकेशन हाताळता येत नसल्याने प्रत्येक महिन्याला सुखबीर सिंहकडे मोबाईल फोन देवुन ते मुळगावी कुटूंबाला पैसे ट्रान्सफर करत होते.
हेही वाचा : पनवेलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव, ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन
१० डिसेंबरला राम रतन पार्किंगमध्ये लावल्या जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंदणीचे काम करत होते. यावेळी सुखबीरने ज्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला होता, त्याच ठिकाणी रामरतन सिंह यांनीही मोबाईल चार्जिंगला लावला होता. दुसऱ्या दिवही फोन किंवा मॅसेज येत आणि जातही नसल्याने मोबाईल बिघडला या शंकेने मोबाईल दुरुस्तीला टाकला. मात्र मोबाईलमध्ये फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये बँकेशी लिंक असलेले सिमकार्ड नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा स्वतःच्या नंबरचे दुसरे सिमकार्ड फिर्यादीने घेतले. हे सिमकार्ड एक्टिव्ह होताच बँकेचे तीन मॅसेज आले.
त्यानुसार तीन वेळा मिळून ३ लाख ५ हजार रुपये बलजीत सिंग यांच्या खात्यात गेल्याचे नमूद केले होते. हे सर्व पैसे मोबाईलमधून ऑनलाईन गेले होते. मोबाईलमधील फोन पे पासवर्ड केवळ सुखबिर सिंग याला व फिर्यादी यांना माहिती होते. त्यामुळे फिर्यादी यांनी सुखबीर याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. त्याची छाननी करून सुखबीर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.