नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने रविवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी पोहोचल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती. महायुतीच्या राजकारणात सद्यस्थितीत हा मतदारसंघ भाजपाकडे असून दोन वेळा येथून आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांची घेतलेली भेट ही महाविकास आघाडीची मोट अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नचा भाग असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : पुन्हा तोच जोश; साताऱ्यानंतर नवी मुंबईत शरद पवारांची भर पावसात सभा, म्हणाले, “निराशेवर मात करून…”
तसेच बेलापूर मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडला जावा यासाठी करण्यात येणाऱ्या वातावरण निर्मितीचाही हा प्रयत्न असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा नवी मुंबईत हा पहिलाच दौरा होता. या फुटी नंतर पक्षाचे नवी मुंबई प्रमुख नामदेव भगत हे अजित पवार गटात सहभागी झाले. याशिवाय पक्षाचे यापूर्वीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी नवे सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे यांची साथ धरली. त्यामुळे नवी मुंबईत सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था तोळा मासा झाली असली शरद पवार आणि या पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग या ठिकाणी स्थायिक आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठांमधून कार्यरत असणारे व्यापारी माथाडी ही एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी वोट बँक समजली जात असे.
हेही वाचा : निराश न होता काम करीत राहण्याचा निर्धार करा; शरद पवार
पुणे, जुन्नर, नारायणगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील अनेक रहिवाशी नवी मुंबईत स्थायिक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील हा रहिवाशी नवी मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करताना दिसत असे. २०१४ नंतर मतदानाचा हा पॅटर्न बदललेला दिसला असला तरी शरद पवार यांना मानणारा एक मोठा गट अजूनही नवी मुंबईत आहे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून रिंगणात उतरलेले अशोक गावडे यांना मिळालेली मते हा पवार यांचा करिष्मा मानला गेला. असे असले तरी गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील राजकारण कमालीचे बदलले असून बेलापूर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हे करत असताना महाविकास आघाडीची मोट अधिक घट्ट व्हावी असाही प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील नेत्यांकडून सुरू आहे.
हेही वाचा : सातारची पुनरावृत्ती होणार काय? नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाऊस आणि जोरदार वारा
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे हे दोन्ही नेते समन्वयाने काम करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी नवी मुंबईच्या भेटीवर आलेले शरद पवार यांना विठ्ठल मोरे, समीर बागवान यांसारखे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी भेटल्याने नवी मुंबईतील बदलत्या राजकीय समीकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.