नवी मुंबई : डायघर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका मंदिर परिसरात नवी मुंबईतील विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. नवी मुंबईतही अनेक निर्जन वा अत्यल्प वर्दळीची ठिकाणे आहेत. डायघरसारखी घटना नवी मुंबईत होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात तसेच डायघर मधील घडलेल्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने केली आहे.
घरगुती भांडणातून बेपत्ता झालेल्या बेलापूर मधील महिलेवर तीन पुजाऱ्यांनी कल्याण शिळफाटा येथील घोल मंदिर परिसरामध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात वार करून आणि गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खटला जलद गतीने चालवण्यात येऊन आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी या अनुषंगाने कारवाई करावी, असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिलेे. तसेच अशी घटना नवी मुंबईत घडू नये म्हणून उपाययोजना सुचवल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, शहर, उपाध्यक्ष समीर बागवान, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर आदि उपस्थित होते.
हेही वाचा : पनवेल: अपघातग्रस्तांसाठी पोलीस व एमजीएम रुग्णालयाचे आपत्ती ३५ डॉक्टर आणि ४० आरोग्यसेवक
सुचवलेल्या उपाययोजना
● सर्व प्रकारच्या प्रार्थना स्थळांमध्ये नेमण्यात आलेल्या तसेच वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक पोलिसांना देणे अनिवार्य, तसेच चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे.
● तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलीस ठाण्यामध्ये देणे आवश्यक असावे.
● नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रांमधील निर्जन ठिकाणी असणाऱ्या पर्यटनाच्या जागा, धार्मिक स्थळे अश्या ठिकाणी पोलिसांकडून नियमित गस्त सुरू करावी.
हेही वाचा :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरा बंदच
उरणमध्ये महिला संघटनांची निदर्शने
पिडीतेच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी महिला संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी उरणच्या गांधी चौकात महिलांनी निदर्शने केली. महिला संघटनांनी यावेळी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. या घटनेला अत्याचार व हत्या करणारे जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा अधिक जबाबदार पिडीतेच्या सासरची मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही हत्येस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हेमलता पाटील, सिमा घरत,रेखा घरत,नाहिदा शेख, हुसेनला शेख , ममता पाटील, सुजाता गायकवाड,अ़फशा मुकरी, अमिता ठाकूर, सविता पाटील तसेच अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या.