नवी मुंबई : चोरांपासून घरातील सामान सुरक्षित राहावे म्हणून अत्याधुनिक उपकरणांवर सध्या भर दिला जात आहे. मात्र हे करताना हि उपकरणे जेथे बसवली जात आहेत, तेही उत्तम दर्जाचे आवश्यक आहे. अन्यथा स्वयंचलित कुलूप बसवले तरी दरवाजाची चौकडी उचकटून चोरी होऊ शकते. असाच अनुभव उलवे येथील एका कुटुंबाला आला आहे. सोमनाथ पवार हे उलवे सेक्टर १९ येथे राहतात. स्वतः सोमनाथ आणि त्यांच्या पत्नी दोघेही नोकरी करतात. दोघेही नोकरी निमित्त बाहेर जात असल्याने त्यांच्या घरात त्या वेळेत कोणी नसते. त्यामुळे त्यांनी घराच्या दरवाजाला ऍटोमेटिक कुलूप लावून घेतले आहे.
हेही वाचा : नवी मुंबई पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ
२५ तारखेला दोघे नेहमी प्रमाणे दरवाजाला स्वयंचलित कुलूप लावून दरवाजाला नुसती कडी लावून नोकरीच्या ठिकाणी गेले. मात्र परत आल्यावर घराची कडी उघडली असता स्वयंचलित कुलूप जवळील चौकट उचकटलेली दिसली व दरवाजा उघडला गेला. आत जाऊन पाहणी केली असता घरातील दागिने, लहान मुलांचे दागिने असा ९० हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.