नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात अतिक्रमण विरोधी पथकाच्या अरेरावी, दादागिरी विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला. सेक्टर १५ येथे दुकानासमोरील फलक न नेण्याची विनंती करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली. अतिक्रमण विभागाने सर्वत्र जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुसरीकडे अशी कारवाई होत असताना अतिक्रमण पथकातील कंत्राटी तरुण वर्गाकडून दादागिरी, अरेरावी आणि प्रसंगी थेट मारहाण होत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत.
असाच प्रकार कोपरखैरणे सेक्टर १५ येथे घडला. सकाळच्या वेळी अतिक्रमण पथक कारवाई करण्यास गेले. येथील दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत सहज हलवता येणारा फलक उचलून नेत असताना त्या दुकानदाराने पथकातील तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दुकानदाराला अतिक्रमण पथकातील तरुणांकडून मारहाण करण्यात आली . तसेच त्याला चारी बाजूंनी घेरून अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हे होत असताना मनपा अधिकारी घटनेचे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये करण्यात गुंग होते. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुसरीकडे असे काही घडले नाही, दुकानदारानेच मारहाण केली, असा दावा मनपा अधिकाऱ्याने केला. मारहाण केली असेल तर पोलीस ठाण्यात गुन्हा का नोंदवला नाही? अशी विचारणा केल्यावर संबंधित अधिकाऱ्याने बोलणे टाळले.
हेही वाचा : पनवेल : कामोठे येथील अक्षर इमारतीमध्ये आग
या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी दोन तास सेक्टर १५ चे मार्केट बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. “या परिसरात ५०-५० हजार रुपये भाडे देत दुकानदार आपला व्यवसाय करतात. ग्राहकांना कळावे म्हणून दुकानासमोरील मोकळ्या जागेत फलक लावला तरी कारवाई होते. विशेष म्हणजे हे फलक पदपथ किंवा रस्त्यावर ठेवले जात नाहीत. दुसरीकडे बेसुमार अवैध फेरीवाले बसतात. आमच्या दुकानात ग्राहकांना येता येत नाही. पायऱ्या, रस्ते, पदपथ सर्वांवर पथारी पसरतात. त्यांच्यावर मात्र का कारवाई केली जात नाही”, असे व्यापारी राजू राजपुरोहित यांनी म्हटले आहे.