नवी मुंबई : येथील डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये जागतिक कीर्तीचा कोल्ड प्ले या वाद्यावृंदांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १८, १९ आणि २१ तारखेला हा कार्यक्रम होईल. शनिवारी पहिल्याच हजारो वाहनांमुळे दिवशी शीव-पनवेल आणि नेरुळ जुईनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर खारघरच्या पुढे पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये या कार्यक्रमासाठी किमान ७५ हजार नागरिक आणि त्या अंदाजाने १५ ते १८ हजार गाड्या येण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरली होती. तसे नियोजनही केले होते. कार्यक्रम रात्री असला तरी दुपारी दोनपासून स्टेडियममध्ये सोडण्यात येणार असल्याने गर्दी जमू लागली आणि तीन-साडेतीनपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा : ‘महसूल’मधील वाद चव्हाट्यावर; विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन अधिकार पुन्हा मेट्रो सेंटरकडे
रुग्णांचे हाल : शीव पनवेल मार्गावर मुंबईच्या दिशेने नेरुळपासून पुढे पाच-सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्यक्रम परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते, याचा फटका याच स्टेडियमच्या मागील बाजूस डॉ. डी वाय पाटील रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. रुग्णांनाही सोडले जात नसल्याने दुपारी चारच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांचे आणि पोलिसांचे वादही झाले. या वादानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत रुग्णांना गाडीने थेट रुग्णालय पर्यंत प्रवेश सुरू केला. अशीच अवस्था रविवार झाली तर सोमवारचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा सावंत यांनी दिला.
हेही वाचा : नवी मुंबई: तीन दिवसांत सव्वादोन लाख श्रोते
वाहतूक कोंडी कुठे?
स्टेडियम परिसरातील सर्व रस्ते, एसबीआय कॉलनी रस्ता, शनी मंदिर मार्ग, डॉ. डी वाय पाटील रुग्णालय रस्ता, भीमाशंकर कॉलनी मागील गेट रस्ता (उरण फाटा जवळ), शीव पनवेल मुंबई दिशेची मार्गिका, शीव पनवेल मार्गालगत असणारा एमआयडीसी सेवा मार्ग.