नवी मुंबई : सर्वाधिक वाहतूक कोंडी कोपरखैरणे, सेक्टर १५ च्या नाक्यावर होते. मात्र याकडे महापालिकेने अद्याप गांभीर्याने पाहिले नाही. आता तर वाहतूक पोलिसांनीच मनपाकडे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची मागणी केली आहे. रा. फ. नाईक चौक ते तीन टाकीदरम्यान असणाऱ्या या नाक्यावर दैनंदिन बाजार तसेच मोठ्या प्रमाणावर बेकायदा फेरीवाल्यांचे बस्तान असते. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. सेक्टर ७ आणि १५ दरम्यान शेकडो लोक रस्ता ओलांडत असतात. सेक्टर १५, १६, १७, १८, १९ येथे राहणारे रहिवासी स्टेशनपासून चालत आल्यावर याच ठिकाणी रस्ता ओलांडतात. येथे सरकते जिने करावेत अशी मागणी वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा केली होती. आता नव्याने हीच मागणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : अबब… कळंबोली परिसराचा वायू गुणवत्ता निर्देशांक ३३० वर
कोपरखैरणेत पार्किंग प्लाझा गरजेचा
ल्ल मनपाचे कायमच कोपरखैरणे भागाकडे दुर्लक्ष होते. वाहतुकीचे तेच आहे. उत्तम सोयीसाठी सीबीडी- वाशी- नेरुळ यापलीकडे महापालिकेला काही दिसत नाही. वास्तविक वाशीपेक्षा भीषण परिस्थिती सेक्टर १५ च्या नाक्यावरील आहे. विशेष म्हणजे तशी जागाही आहे. मात्र पादचारी पूल वाशीला बांधत आहेत. याशिवाय कोपरखैरणेतील स्थानिक लोकप्रतिनिधीही जोरदार मागणी करीत नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुदेश जाधव या रहिवाशाने दिली. पार्किंग प्लाझाची सर्वाधिक गरज कोपरखैरणेला आहे. मात्र वाशीला आज मितीस वाशी अग्निशमन इमारतीत असलेली ३५० गाड्यांची पार्किंग अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे, अशी प्रतिक्रिया दामोदर पाटील या अन्य रहिवाशाने दिली.
हेही वाचा : पनवेल, उरणमध्ये भाजपला धक्का, शेकापला संजीवनी ?
“सेक्टर १५च्या नाक्यावर वाहतूक कोंडी वारंवार होण्याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणावर पादचारी रस्ता ओलांडतात. हा रस्ता बंद केला तर फार मोठा वळसा घालावा लागेल. ते पादचाऱ्यांसाठी खूप लांब ठरते. त्यामुळे पादचारी पुलाची गरज असून याबाबत मनपाशी समन्वय साधण्यात येणार आहे.” – तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग